▪️मूल शहरात मोकाट कुत्र्यांचा हैदोस..वासराचा घेतला बळी, नगर परिषद मूल प्रशासनाचे दुर्लक्ष..

डॉ. आनंदराव कुळे
मूल तालुका प्रतिनिधी
मो. क्र. ९४०३१७९७२७
मूल – ( इंडिया २४ न्यूज ) : मूल शहरात सध्या मोकाट कुत्र्यांच्या दहशतीने नागरिक आणि पशुपालक त्रस्त झाले आहेत. शहरात मोकाट कुत्र्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले असून, आज सकाळी एका निष्पाप वासराला या कुत्र्यांनी फाडून खाल्ल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
आज सकाळी ८:२० वाजताच्या सुमारास मूल येथील मोकळ्या मैदानात मोकाट कुत्र्यांच्या टोळीने एका वासराला घेरून त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात वासराचा मृत्यू झाला असून कुत्र्यांनी त्याला गंभीररित्या जखमी केले आहे. परिसरात मोकाट कुत्र्यांसोबतच डुकरांचाही मोठा वावर वाढला असून, हे प्राणी आता पाळीव जनावरांसाठी जीवघेणे ठरत आहेत.
शहरातील मुख्य रस्ते आणि गल्लीबोळांमध्ये कुत्र्यांच्या झुंडी फिरत असतात, ज्यामुळे लहान मुले आणि वृद्ध नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. वारंवार तक्रारी करूनही नगर परिषद प्रशासनाकडून यावर कोणतीही ठोस कारवाई होताना दिसत नाही.
“शहरातील मोकाट कुत्र्यांचा आणि डुकरांचा बंदोबस्त करण्यासाठी मूल नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनी तात्काळ या प्रकरणाची दखल घ्यावी. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रशासनाने योग्य तो निर्णय घेऊन मोकाट जनावरांचा तातडीने बंदोबस्त करावा,” अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.



