▪️घरगुती एलपीजी गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी जिल्ह्यात तपासण्या..
▪️संबंधित यंत्रणांना जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश..

*. शिल्पा बंनपुरकर*
*🔸संपादक*
*🔸मो नं. 7030292628*
चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : दि. 12 : जागतिक स्तरावर निर्माण होत असलेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर इंधन तुटवड्याची शक्यता लक्षात घेता घरगुती एलपीजी गॅसचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी तसेच गॅसचा अवैध वापर व काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत.
केंद्र व राज्य शासनाचे आदेश, नियम आणि मार्गदर्शक तत्वांच्या अनुषंगाने घरगुती एलपीजी गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी गॅस एजन्सींच्या तपासण्या करण्याबाबत शासनाकडून सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, सर्व पोलीस निरीक्षक, मनपा आयुक्त, सर्व नगर परिषद मुख्याधिकारी व इतर संबंधित अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात दक्षता पथक किंवा फिरते पथक स्थापन करून नियमित तपासण्या कराव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दिले आहेत.
घरगुती एलपीजी गॅस सिलिंडर तसेच व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीत राहील, याची विशेष दक्षता घ्यावी. तसेच घरगुती गॅसचा व्यावसायिक किंवा अन्य अवैध वापर होत असल्यास त्यावर तात्काळ कारवाई करावी, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. यासोबतच संबंधित विभागांनी केलेल्या तपासण्या व कारवाईचा अनुपालन अहवाल नियमितपणे जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील नागरिकांनी घरगुती गॅसचा केवळ घरगुती वापरासाठीच उपयोग करावा व अवैध वापर किंवा काळाबाजार आढळल्यास प्रशासनाला माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.


