▪️मूल मध्ये उन्हाळ्यात पाणी टंचाई भासू देणार नाही : नगराध्यक्षा एकता समर्थ यांची ग्वाही

डॉ. आनंदराव कुळे
मूल तालुका प्रतिनिधी
मो. क्र. 9403179727
मूल – ( इंडिया 24 न्युज ) : येथील पाणी पुरवठा योजनेला जाणूनबुजून अडचणीत आणल्या जात आहे. थकीत बील भरल्यानंतरही वारंवार पाणी पुरवठयाची वीज कपात करण्यात आली. हा मोठा सुडबुद्धीचा डाव असल्याचे उघडकीस येत आहे. वीज कपातीचे संकट अजूनही कायम आहे. त्याला वीज वितरण कंपनी खतपाणी घालत आहे. परंतु, उन्हाळ्यात मूल मध्ये कदापीही पाणी टंचाई भासू देणार नाही, अशी खणखणीत ग्वाही कॉग्रेसच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौं.एकता प्रशांत समर्थ आणि उपाध्यक्ष राकेश रत्नावार यांनी दिली. मूल नगर पालिका सभागृहात शुक्रवारी (20 मार्च ) सायंकाळी पाणी टंचाई बाबत घेतलेल्या पत्रकार परिषदेत अध्यक्ष, उपाध्यक्ष बोलत होते. यावेळी उपस्थित पदाधिका-यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात यामागे बोलविता धनी वेगळाच असल्याची दाट शंका व्यक्त केली. पाणी पुरवठा योजनेची वीज वारंवार खंडीत का होते ? याबाबत वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता यांना विचारणा केली आहे. तसेच कायमस्वरूपी उपाययोजना राबविण्याचे सांगितले. पाणी पुरवठा योजना ही अत्यावश्यक सेवा असतानाही कंपनीचे कृत्य हे अत्यंत गैरजबाबदारीचे आणि निषेधार्य असल्याचे सौं.समर्थ आणि श्री.रत्नावार यांनी यावेळी सांगितले. प्रशासक काळापासून पाणी पुरवठा योजनेवर 65 लाख रूपयांचे थकीत वीज बील होते. पालिकेमध्ये 5 जानेवारी 2026 रोजी कॉग्रेसची सत्ता पदारूढ झाली. असे असतानाही थकीत बीलापोटी वीज वितरण कंपनीने विविध कारणे दाखवून पाणी पुरवठा योजनेतील वीज जानेवारी महिण्यात एकदा आणि फेब्रुवारी महिण्यात तीनदा कपात केली. त्यामुळे येथील पाणीपुरवठा खंडित झाला आणि जनतेचा रोष प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांना पत्करावा लागला. परंतु, पालिकेने जानेवारी महिण्यात दोनदा आणि फेब्रुवारी महिण्यात तीनदा वीज वितरण कंपनीचे थकीत पैसे भरले. असे एकूण चाळीस लाख 88 हजार रुपयंाचा भरणा केला असतानाही कंपनीने पाणी पुरवठा विभागाच्या अभियंतांना पुन्हा पैसे भरा अशी सरळ धमकीच दिली. ही कृती अकलेचे तारे तोडणारी असल्याचे नगराध्यक्षांनी यावेळी सांगितले.
शहरवासियांच्या हिताचा विचार न करता वीज वितरण कंपनीचे हे कार्य सुडबुदधीचे असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
काँग्रेसची सत्ता असलेल्या मूल मध्येच वीज वितरण कंपनीची वक्रदृष्टी का ? अधिकारी दबावात काम करतात काय? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. नागरिकांच्या हितासाठी आणि निवडणुकीत दिलेल्या आश्वासनानुसार पुढील वाटचाल सुरुळीत सुरू राहणार असून मूलमध्ये उन्हाळ्यात आम्ही पाणी टंचाई भासू देणार नाही. टंचाई स्थिती निर्माण झाल्यास विविध उपाययोजनाबाबत आमचा आराखडा तयार असल्याचे सौं.एकता समर्थ यांनी सांगितले. नगर पालिकेची आर्थिक स्थिती डबघाईस आलेली असली तरी, 15 वे वित्त आयोगाच्या निधीतून विविध कामे करण्याचा मानस त्यांनी बोलून दाखविला. सध्या पाणी पुरवठा योजनेच्या विविध कामासाठी लाखो रुपयांच्या निधीची आवश्यकता असल्याचे नगराध्यक्षा सौं.समर्थ यांनी सांगितले. निधी साठी लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे त्या म्हणाल्या. पत्रकार परिषदेला उपाध्यक्ष राकेश रत्नावार, पाणी पुरवठा सभापती विलास कागदेलवार, बांधकाम सभापती प्रशांत समर्थ, शिक्षण सभापती लीना फुलझेले, महिला व बालकल्याण उपसभापती समिक्षा कडस्कर, नगरसेवक अशोक येरमे, विवेक मुत्यलवार, राहूल प्रेमलवार, नगरसेविका ज्योती चटारे, काजल धारणे, उज्वला कामडी, सुशिला खोब्रागडे, स्वीकृत सदस्य गुलाब पठाण, पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.



