▪️ट्रॅफिक सिग्नल साठी ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन..

राज जांभुळकर : मुख्य कार्यकारी संपादक
भद्रावती – ( इंडिया 24 न्युज ) : दि.२० : ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा भद्रावतीचे बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वार समोरील चौकात ट्रैफिक सिग्नल लावण्याकरीता आज दि.२० मार्च ला जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
शहरातील चंद्रपूर-नागपूर महामार्गावरील बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वार समोरील चौकात दररोज खूप मोठी वाहतूक कोंडी होत असते. कधी कधी दोन्ही बाजूला १ किमी पर्यंत वाहनाच्या रांगा लागतात. सायकल आणि दुचाकीस्वार तसेच जेष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थ्यांना या गर्दीतून वाट काढतांना तारेवरची कसरत करावी लागते. अश्यातच अनेक वेळा या चौकात अपघात सुद्धा झाले आहे.
दि. ३०/०५/२०२५ रोजी झालेल्या रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वारासमोरील चौकात ट्रॉफीक टाइमर सिग्नल व स्पीड ब्रेकर तयार करून बस स्टॉप ते विसावा बार एंड रेस्टारेंट पर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूस “नो पार्किंग झोन” घोषित करण्यासंबंधी सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलिस विभाग आणि परिवहन विभागाला संयुक्त पाहणी करून उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते. परंतु नऊ महिने उलटून गेल्यानंतर देखील अजून पर्यंत ट्रॉफीक सिग्नल लागले नाही. तसेच बैठकीत निर्देश दिल्याप्रमाणे “नो पार्किंग झोन” घोषित करण्यात आला नाही.
त्यामुळे ग्राहक पंचायत महाराष्ट्र, शाखा भद्रावती, जिल्हा चंद्रपूरच्या वतीने जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना पत्र देण्यात आले. तसेच नऊ महिन्यानंतर ही सिग्नल का लागले नाही?, तसेच नो पार्किंग झोन एरिया का घोषित करण्यात आला नाही? याची सखोल चौकशी करून योग्य कारवाई करावी आणि भद्रावतीकरांचा होणारा रोजचा त्रास दूर करावा. अशी मागणी करण्यात आली. यावेळी ग्राहक पंचायत महाराष्ट्र भद्रावतीचे अध्यक्ष प्रवीण चिमुरकर, भारत खोब्रागडे, अरुण जमदाडे आणि दिपक जोगी उपस्थित होते.



