▪️मुंबई येथील गणेश जांभे यांनी स्वतःच्या लग्नाचा वाढदिवस रद्द करून वारकरी विद्यार्थ्यांना मोफत स्कूल बॅगचे वाटप..

*🔸सौ. शिल्पा बंनपुरकर*
*🔸संपादक*
*🔸मो नं. 7030292628*
अकोला – ( इंडिया 24 न्युज ) : आजच्या धावपळीच्या आणि स्पर्धात्मक युगात केवळ शिक्षण नव्हे, तर मुलांमध्ये नैतिक मूल्ये, संस्कार आणि मानवतेची बीजे रुजविणे ही काळाची गरज बनली आहे. अशा परिस्थितीत श्री संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्थेच्या वतीने अकोट येथील श्रद्धासागर परिसरात आयोजित करण्यात आलेले एक महिन्याचे बालसंस्कार शिबिर समाजाला नवी दिशा देणारे ठरत असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक गजानन हरणे यांनी केले.
“बालसंस्कार शिबिरातून मुलांना केवळ पुस्तकी ज्ञान दिले जात नाही, तर त्यांच्यामध्ये शिस्त, संस्कार, समाजभान आणि माणुसकीची जाणीव निर्माण करून खरा माणूस घडविण्याचे कार्य केले जात आहे,” असे ते मार्गदर्शन करताना म्हणाले.श्री संत वासुदेव महाराज यांनी सुरू केलेल्या या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अध्यात्म, संस्कृती आणि नैतिकतेचे धडे मिळत असून, समाज परिवर्तनाची भक्कम पायाभरणी होत असल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.शिबिराच्या २७ व्या दिवशी आयोजित विशेष मार्गदर्शन सत्रात ज्येष्ठ समाजसेवक माधवराव भुईभार व गजानन हरणे यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. यावेळी संस्थेचे सहसचिव अवि गावंडे, कोषाध्यक्ष पुरुषोत्तम लाजूरकर, अध्यक्ष ह.भ.प. वासुदेव महाराज महल्ले, सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर गावंडे, उपाध्यक्ष माधवराव ठाकरे, विश्वस्त अशोक पाचडे, साहेबराव मंगळे, ह.भ.प. राम गाडे महाराज, उमेश महाराज मोहकार आदी मान्यवर विचारपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक व शैक्षणिक प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची मने जिंकली. त्यांच्या आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाने उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली.
यावेळी उपस्थित मान्यवर महादेवराव भूईभार, गजानन हरणे, नंदकिशोर गावंडे यांचा संस्थेच्या वतीने शाल, श्रीफळ आणि श्रीसंत वासुदेव महाराजांची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला. तसेच शिबिरातील विद्यार्थ्यांना स्कूल लेदर बॅगचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
मुंबई येथील गणेशराव जांभे यांनी आपल्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त होणारा अनावश्यक खर्च टाळून त्या निधीतून वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांना स्कूल बॅग सप्रेम भेट देत सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण केला. त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल संस्थेच्या वतीने विशेष गौरव करण्यात आला.
याप्रसंगी संस्थेचे सहसचिव अवि गावंडे यांनी जांभे परिवाराचे आभार मानताना सांगितले की, “वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस किंवा इतर कौटुंबिक समारंभांवर होणारा वायफळ खर्च टाळून समाजोपयोगी कार्यासाठी हातभार लावणे ही खरी मानवसेवा आहे. समाजातील इतर परिवर्तनवादी व मानवतावादी व्यक्तींनीही अशा उपक्रमांतून प्रेरणा घ्यावी.”
कार्यक्रमाचे प्रभावी संचालन ह.भ.प. अंबादास महाराज मानकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन सहसचिव अवि गावंडे यांनी मानले. कार्यक्रमाला संस्थेचे पदाधिकारी, कर्मचारी, सेवाधारी तसेच मोठ्या संख्येने बाल प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.बालसंस्कार, अध्यात्म आणि सामाजिक जाणीव यांचा सुंदर संगम घडविणारे हे शिबिर आजच्या पिढीला सुसंस्कृत भवितव्य देणारे ठरत असून, समाजमनात आशेचा नवा दीप प्रज्वलित करीत आहे. तसेच यावेळी सुमरण फाउंडेशन अकोल्याच्या वतीने संस्थेला मोफत आंबे उपलब्ध करून देऊन मुलांना “आंबे खाण्याचा कार्यक्रम “ठेवून मुलांना आंबे खाऊ घातले व त्यांच्या तोंडावर मामाच्या घरचा आनंद फुलवला त्याबद्दल संस्थेच्या वतीने सुमरम फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉ.पूजा खेतान व पदाधिकाऱ्यांचे धन्यवाद मानून आभार व्यक्त केले.


