▪️आशा वर्करांना २८ महिन्यांचा भत्ता द्या अन्यथा तीव्र आंदोलन; ११ जून रोजी सिरोंचा येथे धरणे..

गडचिरोली जिल्हा प्रतिनिधि उज्वल देवनाथ
सिरोंचा – ( इंडिया 24 न्युज ) : कोरोना महामारीच्या काळात जीवाची पर्वा न करता गावागावात जाऊन सेवा देणाऱ्या आशा वर्करांना आजपर्यंत शासनाने जाहीर केलेला प्रोत्साहन भत्ता न देणे ही अत्यंत गंभीर व संतापजनक बाब आहे. या अन्यायाविरोधात पंचायत समिती सिरोंचा समोर दिनांक ११ जून २०२६ रोजी धरणे आंदोलन छेडण्यात येणार असून भारतीय कम्युनिस्ट पक्ष (भाकपा) व आयटकच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन उभारले जाणार आहे. या आंदोलनाचे नेतृत्व भाकपा जिल्हा सहसचिव कॉ. सचिन मोतकुरवार करणार असून तालुक्यातील सर्व आशा वर्कर मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज दिनांक ०४ जून २०२६ रोजी गटविकास अधिकारी, पंचायत समिती सिरोंचा यांना निवेदन देण्यात आले. यावेळी भाकपा जिल्हा सदस्य कॉ. सूरज जककुलवार, भाकपा तालुका सचिव कॉ. रवी बारसांगडी ,आशा वर्कर व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
कोरोना काळात आशा वर्करांनी अक्षरशः रणांगणात उतरून काम केले. स्वतःच्या कुटुंबाची काळजी बाजूला ठेवून त्यांनी कोरोना रुग्णांचा शोध, सर्वेक्षण, लसीकरण, क्वारंटाईन व्यवस्था, जनजागृती अशा अत्यंत धोकादायक जबाबदाऱ्या पार पाडल्या. अनेकांना पुरेसे संरक्षण साहित्यही उपलब्ध नव्हते, तरीही त्यांनी आपले कर्तव्य थांबवले नाही. अनेक आशा वर्करांना संसर्गाचा धोका पत्करावा लागला, तरीही शासनाने त्यांच्या कष्टांची योग्य दखल घेतलेली नाही.
शासन निर्णयानुसार आशा वर्करांना कोरोना प्रोत्साहन भत्ता म्हणून प्रतिमहिना १००० रुपये २८ महिन्यांसाठी देणे बंधनकारक आहे. मात्र आजपर्यंत हा भत्ता न मिळणे म्हणजे शासनाची सरळसरळ दिरंगाई व कामगारांप्रती असलेली उदासीनता दर्शवते.
कॉ. सचिन मोतकुरवार यांचे वक्तव्य :
“कोरोना काळात आशा वर्करांनी जीव धोक्यात घालून काम केले, तेव्हा शासन कुठे होते? आज त्यांच्या हक्काचा भत्ता देण्याची वेळ आली असताना शासन टाळाटाळ करत आहे. २८ महिन्यांचा प्रति महिना १००० रुपये भत्ता तात्काळ न दिल्यास आम्ही हे आंदोलन अधिक तीव्र करू. गरज पडल्यास रस्त्यावर उतरून मोठा लढा उभारू. प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी, अन्यथा येणाऱ्या परिणामांची पूर्ण जबाबदारी शासनावर राहील.”
या आंदोलनामुळे प्रशासनावर मोठा दबाव निर्माण होणार असून आशा वर्करांच्या हक्कासाठी संघर्ष अधिक तीव्र होण्याचे संकेत मिळत आहेत.



