आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️महाराष्ट्रात स्वतंत्र योग आयोग स्थापन करा : आ. सुधीर मुनगंटीवार यांची आग्रही मागणी..

▪️पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी योगाला दिली जागतिक ओळख; महाराष्ट्र सरकारने आता भूमिका घ्यावी

 

मुख्य संपादक श्री तुळशीराम जांभुळकर

चंद्रपूर – ( इंडिया 24 न्यूज ) : “योगः कर्मसु कौशलम्” आणि “समत्वं योग उच्यते” असे भगवद्गीतेत योगाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे. योग ही भारताच्या प्राचीन संस्कृतीची जगाला मिळालेली अमूल्य देणगी असून तो मन, शरीर, विचार आणि कृती यांच्यातील एकात्मतेचे प्रतीक आहे, असे योगाचे महत्त्व देशगौरव पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी अधोरेखित केले आहे. पंतप्रधान मोदीजी यांच्या पुढाकारामुळे २१ जून हा दिवस संपूर्ण जगात आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो. मात्र, योगाला जागतिक स्तरावर मान्यता मिळूनही महाराष्ट्रात त्याच्या संवर्धन, प्रशिक्षण, संशोधन आणि प्रसारासाठी स्वतंत्र शासकीय यंत्रणा अस्तित्वात नसणे दुर्दैवी असल्याचे सांगत राज्यात स्वतंत्र योग आयोगाची स्थापना करावी, अशी आग्रही मागणी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

या संदर्भात आ. मुनगंटीवार यांनी यापूर्वी विधानसभेतील अर्धा तास चर्चेदरम्यान ही मागणी ठामपणे मांडली होती. तसेच २७ जानेवारी २०२५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना निवेदन सादर करून योग आयोग स्थापन करण्याचा प्रस्ताव पुढे नेण्याची विनंती केली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी संबंधित प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले होते. आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत अर्धा तास चर्चा २५ मार्च २०२६ रोजी उपस्थित करत योग आयोग स्थापन करण्याची मागणी केली होती. विधानसभेत या चर्चेला उत्तर देताना वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी गुजरात व राजस्थानच्या धर्तीवर महाराष्ट्रातही योग आयोग स्थापन करण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक असल्याचे स्पष्ट केले होते, तसेच स्वतंत्र आयुष मंत्रालय स्थापन करण्याबाबतही कार्यवाही सुरू असल्याचे सांगत लवकरच योग आयोग स्थापन करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याबद्दल आ. मुनगंटीवार यांनी खंत व्यक्त केली आहे.

येत्या २१ जून आंतरराष्ट्रीय योग दिनापूर्वी महाराष्ट्रात स्वतंत्र योग आयोग स्थापन करण्याबाबत शासनाने ठोस निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करत आ. मुनगंटीवार यांनी या विषयाला प्राधान्याने न्याय देण्याचे आवाहन केले आहे. देशातील मध्यप्रदेश, गुजरात, हरियाणा, उत्तराखंड आणि राजस्थान या राज्यांमध्ये योग आयोग कार्यरत असून त्या माध्यमातून योग प्रशिक्षण, संशोधन, जनजागृती आणि आरोग्यवर्धक उपक्रमांना प्रभावी चालना मिळत आहे.
महाराष्ट्रातही अशी सक्षम यंत्रणा उभी राहिल्यास लाखो योगसाधक, प्रशिक्षक, विद्यार्थी आणि आरोग्य क्षेत्राशी संबंधित व्यक्तींना नवे व्यासपीठ उपलब्ध होईल. वाढता मानसिक तणाव, बदलती जीवनशैली आणि विविध आरोग्यविषयक समस्यांच्या पार्श्वभूमीवर योग हे केवळ व्यायामाचे साधन नसून निरोगी, सशक्त आणि संतुलित समाज घडविण्याचा प्रभावी मार्ग आहे. योग आयोगाच्या माध्यमातून राज्यभर योग शिक्षण, संशोधन, प्रमाणित प्रशिक्षण, जनजागृती आणि आरोग्य संवर्धनासाठी व्यापक धोरणात्मक काम करता येईल, ज्यामुळे योग क्षेत्राला संस्थात्मक बळ मिळून महाराष्ट्र देशासाठी आदर्श ठरू शकतो, असेही आ.मुनगंटीवार यांनी नमूद केले.

पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी योगाचा विषय जागतिक स्तरावर नेला, पण महाराष्ट्रात याबाबत उदासीनता का असा थेट सवाल उपस्थित करत आ. मुनगंटीवार यांनी राज्य सरकारला त्वरित निर्णय घेण्याचे आवाहन केले आहे. योग आयोगाची स्थापना हा केवळ प्रशासकीय निर्णय नसून महाराष्ट्राच्या भावी पिढीच्या आरोग्यदायी, सुसंस्कृत आणि संतुलित जीवनाचा पाया रचणारा निर्णय ठरेल. त्यामुळे योगप्रेमींच्या भावना, प्रशिक्षकांच्या अपेक्षा आणि राज्याच्या आरोग्यदायी भविष्यासाठी सरकारने आता विलंब न करता स्वतंत्र योग आयोग स्थापन करण्याचा ऐतिहासिक निर्णय घ्यावा, अशी आग्रही अपेक्षा आ. मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.

*आ.मुनगंटीवार यांचा योग आयोगासाठी सरकारकडे ठाम आग्रह*

विधानसभेत दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करत राज्यात स्वतंत्र ‘महाराष्ट्र योग आयोग’ स्थापन करावा, अशी मागणी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि माधुरी मिसाळ राज्यमंत्री वैद्यकीय शिक्षण यांच्याकडे ४ जून २०२६ रोजी पत्राद्वारे केली आहे. योग शिक्षण, संशोधन, प्रशिक्षण, नोंदणी, गुणवत्ता नियंत्रण व जनजागृती यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी राहावी तसेच महाराष्ट्राला योग क्षेत्रात अग्रणी स्थान मिळावे, यासाठी आगामी आंतरराष्ट्रीय योग दिनापूर्वीच महाराष्ट्र योग आयोग स्थापनेची घोषणा करावी, अशी विनंती आ. मुनगंटीवार यांनी केली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.