आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️चंद्रपूर येथील वस्‍तु व सेवा कर (जीएसटी भवन) इमारतीच्‍या लोकार्पण सोहळा संपन्न.. जीएसटी मुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत भर – पालकमंत्री डॉ. उईके

▪️महाराष्ट्राच्या विकासात चंद्रपूरचे योगदान – वित्त राज्यमंत्री ॲङ जयस्वाल

 

मुख्य संपादक श्री. तुळशीराम जांभुळकर

चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : दि. १८ : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ जुलै २०१७ पासून देशात वस्तु व सेवा कर (जीएसटी) ही एकच करप्रणाली लागू केली आहे. या सुलभ कर पध्दतीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत भर पडत असून आज चंद्रपूर येथे वस्तु व सेवा कर विभागाच्या उत्तम इमारतीचे लोकार्पण होत आहे, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांनी केले.

वस्तु व सेवा कर नुतन इमारतीचे लोकार्पण करतांना ते बोलत होते. यावेळी मंचावर वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲङ आशिष जयस्वाल, चंद्रपूर शहराच्या महापौर संगिता खांडेकर, खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार सर्वश्री सुधीर मुनगंटीवार, किशोर जोरगेवार, देवराव भोंगळे, करण देवतळे, जिल्हाधिकारी वसुमना पंत, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, पोलिस अधिक्षक आयुष नोपाणी, मनपा आयुक्त अकुनुरी नरेश, अपर राज्यकर आयुक्त विजय डांगे, राज्यकर सहआयुक्त विनोद गवई आदी उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. वुईके म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र राज्याची अर्थव्यवस्था भक्कम होत असून आपले राज्य पुढे जात आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपस्थित राहणार होते, मात्र मुंबईमध्ये महत्वाच्या बैठका असल्यामुळे राज्य शासनाच्या वतीने मी आणि राज्यमंत्री ॲङ शेलार येथे उपस्थित आहोत. आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या दूरदृष्टीमुळे चंद्रपूर येथे वस्तु व सेवा कर विभागाची उत्तम इमारत तयार झाली, असेही त्यांनी सांगितले.

देशाच्या आणि महाराष्ट्राच्या विकासात चंद्रपूरचे योगदान – वित्त राज्यमंत्री ॲङ जयस्वाल

चंद्रपूर हा उद्योग, वनसंपदेने नटलेला तसेच आर्थिक संपन्न जिल्हा आहे. या जिल्ह्याने नेहमीच सरकारच्या तिजोरीकरीता चांगले उत्पन्न दिले आहे. देशाच्या आणि महाराष्ट्राच्या विकासात चंद्रपूरचे योगदान महत्वाचे आहे, असे वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲङ आशिष जयस्वाल यांनी सांगितले.

पुढे ते म्हणाले, देशाचे पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री यांनी ‘विकसीत भारत – 2047’ चा रोडमॅप तयार केला असून आपल्या राज्याचे महत्वाचे योगदान राहणार आहे. चंद्रपूर आणि गडचिरोली हे जिल्हे आता विकासाच्या मार्गावर अग्रेसर आहेत. गडचिरोलीचे उत्पन्न पहिल्या पाच जिल्ह्यात आणण्याचा मुख्यमंत्र्यांचा संकल्प आहे. या इमारतीचे उत्कृष्ट बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागाने केले असून त्यासाठी ते अभिनंदनास पात्र आहे, असेही त्यांनी सांगितले.

प्रास्ताविकात राज्यकर सहआयुक्त विनोद गवई म्हणाले, सदर इमारत ही चार मजली आहे. इमारतीच्या बांधकामासाठी एकूण 29 कोटी 99 लक्ष 80 हजार रुपये खर्च झाले आहे. सदर इमारत ही चंद्रपूर विभागाचे मुख्यालय असून या अंतर्गत चंद्रपूर, वर्धा व गडचिरोली हे तीन जिल्हे येतात. आर्थिक वर्ष 2025-26 या कालावधीत चंद्रपूर विभागाने सुमारे 1450 कोटी इतका जी.एस.टी.महसूल गोळा केला. लक्षांक पूर्ततेच्या टक्केवारीत 122 टक्के लक्षांक पूर्ती करत चंद्रपूर जिल्ह्याने व्दितीय क्रमांक पटकावला आहे.

तत्पुर्वी मान्यवरांच्या हस्ते नुतन इमारतीच्या कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. तसेच फित कापून सर्व मान्यवरांनी इमारतीची पाहणी केली.

कार्यक्रमाचे संचालन दिनेश मासोदकर आणि ऐश्वर्या भालेराव यांनी केले. यावेळी राज्यकर सहआयुक्त संजय पवार, प्रशांत पाटील, संजय सायगण, सहा. राज्यकर आयुक्त तेजराम मडावी, भुषण शहाणे, संतोष हेमणे आदी उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.