▪️फायनान्स कंपनीच्या नावाने बनावट कर्ज मंजुरीचे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक..
चंद्रपूर सायबर पोलीस स्टेशन ची कामगिरी..

*🔸सौ. शिल्पा बंनपुरकर*
*🔸संपादक*
*🔸मो नं. 7030292628*
चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : बाबुपेठ, चंद्रपूर येथील तक्रारदार हे हार्वेस्टर मशीन विक्रेते आहेत. त्यांचे ग्राहक मार्फत त्यांना हेमंत जोशी नामक व्यक्तीचा संपर्क मिळाला, ज्याने स्वतःला पुनावाला फिनकॉर्प लि. नागपूर चा कर्मचारी असल्याचे सांगितले. तक्रारदार यांचे अन्य ग्राहक यांना हार्वेस्टर खरेदीसाठी कर्जाची आवश्यकता असल्याने, त्यांनी सदर बनावट प्रतिनिधी हेमंत जोशी याच्याशी संपर्क साधला असता हेमंत जोशी याने त्या दोद्यां ग्राहकांच्या घरी जाऊन प्रत्यक्ष भेट घेवुन त्यांच्या सोबत कर्जाचे खोटे एग्रीमेंट केले. त्यानंतर, तक्रारदाराच्या व्हॉट्सअॅपवर बनावट ‘कर्ज मंजुरी पत्र’ (Loan Sanction Letter) पाठवून १५,००,०००/- (पंधरा लाख) रुपयांचे कर्ज मंजूर झाल्याचे भासवले. कर्जाची रक्कम खात्यात जमा करण्यासाठी डाऊन पेमेंट म्हणून ४,४६, २५०/- रुपये ‘वृषभ ईखार, जनरल मॅनेजर, पुनावाला फिनकॉर्प लि.’ या नावाच्या एका बँक खात्यावर जमा करण्यास सांगितले. एका पिडीत ग्राहकांकडुन रोख रक्कम घेऊन तक्रारदार यांनी १६ मे २०२६ रोजी आपल्या मोबाईल मधील बँकेच्या अॅपद्वारे आयएमपीएस (IMPS) द्वारे सदर रक्कम बनावट प्रतिनिधी वृषभ ईखारच्या खात्यावर वर्ग केली. रक्कम जमा झाल्यानंतर आरोपीने पिडीतांना १८ मे २०२६ रोजी कर्ज वितरण व मशीन डिलिव्हरीची खोटी मंजुरी पत्र व वाहन डिलीवरी मेल पाठविले. मात्र, १९ मे २०२६ पासून आरोपीचा मोबाईल क्रमांक बंद येऊ लागला. संशय आल्याने तक्रारदाराने पुनावाला फिनकॉर्प लि. नागपूरच्या कार्यालयात जाऊन चौकशी केली असता, ‘हेमंत जोशी’ नावाचा कोणताही कर्मचारी तेथे कार्यरत नसल्याचे आणि सर्व कागदपत्रे पूर्णपणे बनावट असल्याचे उघड झाले. यावरुन आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तक्रारदाराने सायबर हेल्पलाईन ‘१९३०’ वर ऑनलाईन तक्रार नोंदवली आणि चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद दिली.
फिर्यादीच्या तक्रारीवरून चंद्रपूर शहर पोलिसांनी दिनांक ०३ जून २०२६ रोजी आरोपींविरुद्ध गुन्हा रजि. नंबर ०६६०/२०२६ माहिती तंत्रज्ञान अधिनियम (IT Act), २०००: कलम ६६ (ड) (संगणकीय संसाधनांचा वापर करून तोतयागिरीद्वारे फसवणूक), भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३: कलम ३(५) (समान उद्देशाने केलेली कृती) आणि कलम ३१८(४) (फसवणूक) कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.
सदर गुन्हयाचे गांभीर्य पाहता मा. पोलीस अधीक्षक यांनी सदर गुन्हयाचा तपास सायबर पोलीस स्टेशन यांचे कडे वर्ग केला असता अवघ्या काही दिवसातच सायबर पोलीसांनी तांत्रिक विश्लेषणाअंती गुन्हयातील आरोपी नामे विनोद शांताराम गडाख पाटील वय ४४ वर्ष, ह.मु. फ्लॅट नं. ११०३ लक्झर को-ऑपरेटिव्ह सोसायटी, मोहन नगर, बाणेर, ता. हवेली जि. पुणे याचा शोध घेवुन त्याचे पुणे येथील राहते घरातुन मोठ्या शिताफीने अटक करुन सदर ऑनलाईन फसवणुकीचा गुन्हा उघडकीस आणला आहे.
सदर गुन्हयातील आरोपी विनोद पाटील याने नाशीक (महाराष्ट्र), लखनऊ (उत्तरप्रदेश), इंदोर (मध्यप्रदेश), वडोदरा (गुजरात) या ठिकाणी सुध्दा आपले नांव बदलुन, हेमंत जोशी, हेमंत पवार, रणवीर सिंग सिकरवार, राम हरी चंद, मयंक वानखेडे, अभिषेक शर्मा, जितेंद्र श्रीवास्तव, निखील यादव, विठ्ठल पाटील, विनोद पाटील असे वेळोवेळी नांव बदलुन लोकांची फसवणुक केल्याचे प्रथमदर्शनी तपासात दिसुन येत आहे. सदर आरोपीचा ५ दिवसाचा पोलीस कोठडी रिमांड मा. न्यायालयाने मंजूर केला आहे. तपासा दरम्यान गुन्हयात कलम 238 (सी), 336(2), 338, 340 भारतीय न्याय संहिता अन्वये वाढ करण्यात आले आहे. गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस अत्यंत गांभीर्याने करत आहे.
सदरची कामगिरी श्री आयुष नोपानी पोलीस अधीक्षक सा. चंद्रपूर, श्री ईश्वर कातकडे अपर पोलीस अधीक्षक सा. चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री सुनिल गाडे यांचे नेतृत्वात, सहा. पोलीस निरीक्षक श्री निलेश गिरी, सहा. पोलीस निरीक्षक श्री बलराम झाडोकर, सहा. पोउपनि मुजावर अली, पोहवा/कार्तीक खनके, पोहवा/उमेश रोडे, पोअं/राहुल पोंदे, पोअं/वैभव पत्तीवार, पोअं/गुणवंत मुंडके, पोअं/पंकज बावणे सायबर पोलीस स्टेशन चंद्रपूर आणि पोहवा/खुशाल चांदेकर, पोहवा/मंगेश झाडे पोस्टे चंद्रपूर शहर, पोस्टे बावधन (पिंपरी चिंचवळ) येथील मपोशि अर्चना राहणे, पोअं/बंडगर, पोअं/शिंदे आणि चापोअं/रुषभ बारसिंगे स्थागुशा चंद्रपूर यांनी केली आहे.
आवाहनः
चंद्रपूर पोलिसांतर्फे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या फोन किंवा व्हॉट्सअॅपवरील कर्ज मंजुरीच्या आमिषाला बळी पडू नका. अधिकृत बँकेत किंवा फायनान्स कंपनीत स्वतः जाऊन खात्री केल्याशिवाय कोणत्याही बँक खात्यावर पैसे ट्रान्सफर करू नका. फसवणूक झाल्यास त्वरित राष्ट्रीय सायबर हेल्पलाईन नंबर १९३० वर संपर्क साधावा.



