आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

योग हीच जीवनशैली, आरोग्याची खरी गुरुकिल्ली : – गजानन हरणे

जागतिक योग दिनानिमित्त योग मार्गदर्शन व प्रात्यक्षिक कार्यक्रम उत्साहात संपन्न..

 

राज जांभुळकर : मुख्य कार्यकारी संपादक

अकोला – ( इंडिया 24 न्युज ) : दि. २१ जून आधुनिक युगातील धावपळ, ताणतणाव आणि बदलत्या जीवनशैलीमुळे मानवी आरोग्यापुढे उभ्या राहिलेल्या विविध आव्हानांवर मात करण्यासाठी योग हेच प्रभावी औषध असून, “करा योग, रहा निरोग” हा मंत्र प्रत्येकाने जीवनात अंगीकारला पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक तथा योग शिक्षक गजानन हरणे यांनी केले.
जागतिक योग दिनाचे औचित्य साधून डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथील गुरुदेव मॉर्निंग क्लबच्या वतीने रविवार, दि. २१ जून रोजी सकाळी ६.३० वाजता योगविषयक विशेष मार्गदर्शन व प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. “धकाधकीचे जीवन आणि योग” या समकालीन व अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावर गजानन हरणे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी योगासनांबरोबरच प्राणायामाचे प्रात्यक्षिक सादर करून निरोगी जीवनाचा मंत्र दिला.आपल्या मनोगतात ते म्हणाले की, योग ही केवळ व्यायामपद्धती नसून ती शरीर, मन आणि आत्म्याचा समतोल साधणारी जीवनशैली आहे. नियमित योगाभ्यासामुळे शारीरिक सुदृढता, मानसिक शांतता आणि आध्यात्मिक उन्नती साध्य होते. निरोगी आणि आनंदी जीवन जगण्यासाठी योग हा भारतीय संस्कृतीने जगाला दिलेला अमूल्य ठेवा आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोमा खर्च होते. यावेळी माजी अध्यक्ष शंकरराव गिऱ्हे, डॉ. हरिदास साखरे, अरुण वाघ, अनिल मोहाळे, विलास नाकट, छगन खंडारे, प्रकाश शेगावकर गुरुजी, सुभाष कातखेडे, विलास राठोड, कार्याध्यक्ष गजानन अनासने, डॉ. यशवंतराव चव्हाण, सचिन बापू देशमुख, सचिन साखरकर, विनोद चितवार, सदाशिवराव नावकार, आसोलकर, केशवराव उमाळे, मनोहर वानखडे, राजेश मोरे, पंकज उपाध्ये आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली. पहाटेच्या प्रसन्न वातावरणात संपन्न झालेल्या या उपक्रमात योगप्रेमी, नागरिक, विद्यार्थी, अधिकारी व कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. सामूहिक योगाभ्यासामुळे परिसरात आरोग्य, सकारात्मकता आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. शरीर आणि मनाच्या सुसंवादाचा संदेश देणारा हा उपक्रम उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला. कार्यक्रमाचे प्रभावी संचालन छगन खंडारे यांनी केले, तर आभार प्रदर्शन अरुण वाघ यांनी मानले.जागतिक स्तरावर योगाचे महत्त्व दिवसेंदिवस वृद्धिंगत होत असताना, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील गुरुदेव मॉर्निंग क्लबने आयोजित केलेला हा उपक्रम म्हणजे भारतीय संस्कृतीतील योगपरंपरेचे संवर्धन आणि निरामय समाजनिर्मितीकडे टाकलेले एक सकारात्मक पाऊल ठरले. या कार्यक्रमाला योग अभ्यासक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.