▪️”धार्मिक स्थळाजवळ दारू दुकान चालते, मग जिल्हाधिकारी /उत्पादन शुल्क कार्यालयाजवळ का नाही?”
▪️सुरेशभाऊ पाईकराव यांचा प्रशासनाला उपरोधिक सवाल..

मुख्य संपादक श्री. तुळशीराम जांभुळकर
घुग्घुस – ( इंडिया 24 न्युज ) : घुग्घुस शहरातील धार्मिक स्थळ, पोलीस स्टेशन, तहसील कार्यालय, सार्वजनिक स्मारके तसेच राज्य महामार्गालगत कार्यरत असलेल्या देशी दारू दुकानाच्या परवानगीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत विदर्भ सचिव, आजाद समाज पार्टी तथा सामाजिक कार्यकर्ते सुरेशभाऊ मल्हारी पाईकराव यांनी जिल्हाधिकारी व राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे उपरोधिक निवेदन सादर केले आहे.
सदर निवेदनामध्ये प्रशासनास उद्देशून म्हटले आहे की, जर धार्मिक स्थळांच्या शेजारी, पोलीस स्टेशनच्या परिसरात, तहसील कार्यालयाजवळ आणि राज्य महामार्गालगत देशी दारू दुकानांना परवानगी देणे नियमसंगत व जनहिताचे असेल, तर त्याच धर्तीवर जिल्हाधिकारी कार्यालय, उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय तसेच इतर महत्त्वाच्या शासकीय कार्यालयांच्या परिसरातही दारू दुकानांना परवानगी देण्यात यावी.
पाईकराव यांनी प्रशासनाला दोन पर्याय सुचविले आहेत. एकतर शासकीय कार्यालयांच्या परिसरातही अशा परवानग्या द्याव्यात, अन्यथा घुग्घुस येथील संबंधित देशी दारू दुकानाच्या परवान्याची तात्काळ चौकशी करून नियमभंग आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी.
निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की, नियम सर्वसामान्य नागरिकांसाठी एक आणि प्रभावशाली व्यक्तींसाठी दुसरे असू शकत नाहीत. कायद्याचे समान पालन होणे हीच लोकशाहीची खरी ओळख आहे. त्यामुळे संबंधित परवान्याची निष्पक्ष चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे.
तसेच चौकशीत नियमांचे उल्लंघन, निष्काळजीपणा अथवा गैरप्रकार आढळल्यास संबंधित जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची तसेच कायदेशीर कारवाई करण्यात यावी. तसेच देशी दारू दुकानास देण्यात आलेली परवानगी नियमबाह्य आढळल्यास ती तात्काळ रद्द करण्यात यावी, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या निवेदनामुळे घुग्घुस शहरात दारू दुकानांच्या परवानगी प्रक्रियेबाबत नव्याने चर्चा सुरू झाली असून प्रशासन याबाबत काय भूमिका घेते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
– सुरेशभाऊ मल्हारी पाईकराव
विदर्भ सचिव, आजाद समाज पार्टी
सौ. रिताताई फकरु देशकर जिल्हा महासचिव आजाद समाज पार्टी



