आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

महावितरणची “स्मार्ट’ क्रांती” चंद्रपूर परिमंडळातील ग्राहकांची ९९.३५ लाखांची मोठी आर्थिक बचत..

 

राज जांभुळकर : मुख्य कार्यकारी संपादक

चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : २५ जून २०२६:- वाढत्या महागाईच्या काळात सामान्य ग्राहकांच्या खिशाला होणारी कात्री लक्षात घेता, महावितरणने राबविलेली ‘स्मार्ट टीओडी’ (Time Of Day) मीटर योजना चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्हयातील वीज ग्राहकांसाठी खऱ्या अर्थाने लक्ष्मी ठरत आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन ग्राहकांना आर्थिक सवलत देण्याच्या या महत्वाकांक्षी उपक्रमातून गेल्या दोन महीन्यात ग्राहकांनी तब्बल ९९ लाख ३५ हजार रुपयांची भरघोस बचत केली आहे.
महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या निर्देशानुसार महावितरणने सौर ऊर्जेच्या वापराला चालना देण्यासाठी ही योजना कार्यान्वित केली आहे. दिवसा सौर ऊर्जेची उपलब्धता जास्त असल्याने ती पारंपारीक स्त्रोतांच्या तुलनेत स्वस्त असते. याच स्वस्त विजेचा थेट लाभ ग्राहकांना मिळावा, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेअंतर्गत, सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांना चालू आर्थिक वर्षात प्रती युनिट ८५ पैशांची थेट सवलत दिली जात आहे.
योजनेच्या अंमलबजावनीनंतर ग्राहकांना मिळणारा प्रतिसाद उत्साहवर्धक आहे. एप्रिल २०२६ आणि मे २०२६ या दोन महिन्यांच्या कालावधीत चंद्रपूर जिल्हयातील २ लाख २३ हजार ९०१ ग्राहकांनी ५५ लाख ७७ हजार ५९४ रुपयांची बचत केली आहे. तर गडचिरोली जिल्हयातील २ लाख ७१ हजार ८१७ ग्राहकांच्या खात्यात ४३ लाख ५८ हजार २४८ रुपयांची बचत जमा झाली आहे.परिमंडळातील घरगुती, वाणिज्यीक आणि औदयोगिक अशा विविध प्रवर्गातील सुमारे ४.९५ लाख ग्राहकांकडे स्मार्ट मीटर बसविण्यात आले असुन उर्वरित ग्राहकांनाही लवकरच या प्रक्रियेत सामावून घेतले जाणार आहे.
या योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ग्राहकांचे ‘डिजीटल सक्षमीकरण’. ‘एमसीएल महा ऊर्जा’ ॲपचा माध्यमातून ग्राहक आता आपल्या वीज वापराचा ‘रिअल टाइम’ डेटा पाहू शकतात. मीटर रिडींगची प्रक्रिया पूर्णपणे स्वयंचलित असल्याने मानवी चुकांना पूर्णविराम मिळाला आहे. ग्राहकांना दर तासाला किंवा दिवसाला किती वीज वापरली, याची माहिती मिळत असल्याने विजेचा वापर नियोजीत करणे आता सहज शक्य झाले आहे. बिलांमधील विसंगतीची समस्या दूर होऊन ग्राहकांना त्यांच्या प्रत्यक्ष वापराचेच बिल मिळत आहे.
बँकिंग, रेल्वे आणि मोबाईल सेवांप्रमाणेच वीज वितरण व्यवस्थेला डिजीटल आणि आधुनिक करणे हे महावितरणचे उद्दिष्ट आहे स्मार्ट मीटर हे या आधुनिक ऊर्जा व्यवस्थापनाच्या दिशेने टाकलेले पहिले महत्त्वाचे पाऊल आहे. अचूक बिलींग, तक्रारींचे जलद निराकरण आणि सौर ऊर्जेचा अधिकाधीक वापर या त्रिसूत्रीमुळे चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्हयातील वीज ग्राहक आता खऱ्या अर्थाने सक्षम झाले आहे. भविष्यात सर्वच ग्राहकांना या स्मार्ट सेवेचा लाभ मिळणार असल्याने वीज वापराची ही ‘स्मार्ट’ संस्कृती ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागांत वीज क्रांती घडवून आणेल, असा विश्वास महावितरणने व्यक्त केला आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.