आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️आदिवासी विकास विभागातील चौकीदार पदाची परीक्षा २ ऑगस्टला..

▪️सुधारित प्रवेशपत्र डाउनलोड करण्याचे आवाहन..

 

राज जांभुळकर : मुख्य कार्यकारी संपादक

चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : दि. २६ : आदिवासी विकास आयुक्त, महाराष्ट्र राज्य, नाशिक यांच्या अधिपत्याखालील तसेच एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांच्या आस्थापनेवरील शासकीय आश्रमशाळा व वसतिगृहांमधील गट-ड संवर्गातील चौकीदार पदाच्या ४७८ रिक्त जागांसाठी दिनांक २९ एप्रिल २०२६ रोजी राज्यस्तरीय जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या पदासाठी सरळसेवा भरती परीक्षा महाराष्ट्रातील विविध परीक्षा केंद्रांवर ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येत आहे.

पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार ही परीक्षा २८ जुलै ते १ ऑगस्ट २०२६ या कालावधीत होणार होती. मात्र, परीक्षार्थींकडून प्राप्त झालेल्या परीक्षा केंद्र बदलाबाबतच्या विनंत्या व निवेदनांचा विचार करून परीक्षा केंद्र व वेळापत्रकात काही बदल करण्यात आले आहेत.

चंद्रपूर प्रकल्पासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची परीक्षा २८ जुलै २०२६ रोजी शिफ्ट-२ मध्ये होणार होती. मात्र, आता या परीक्षेच्या दिनांक व शिफ्टमध्ये बदल करण्यात आला असून, संबंधित उमेदवारांची परीक्षा २ ऑगस्ट २०२६ रोजी शिफ्ट-१ मध्ये सकाळी १० वाजता घेण्यात येणार आहे. त्यामुळे चंद्रपूर प्रकल्पासाठी अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांनी या बदलाची नोंद घेऊन सुधारित प्रवेशपत्र (Admit Card) डाउनलोड करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, इतर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांसाठी अर्ज केलेल्या काही उमेदवारांना त्यांनी पसंती दिलेल्या परीक्षा केंद्रांपेक्षा लांबचे परीक्षा केंद्र देण्यात आले होते. या उमेदवारांच्या मागण्यांचा विचार करून त्यांच्या परीक्षा केंद्रात बदल करण्यात आला आहे. मात्र, संबंधित उमेदवारांच्या परीक्षेच्या दिनांकात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

सर्व उमेदवारांनी आपले सुधारित प्रवेशपत्र डाउनलोड करून त्यावरील परीक्षा केंद्र, दिनांक, शिफ्ट व वेळ यांची खात्री करावी, असे आदिवासी विकास विभागाने स्पष्ट केले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.