▪️स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई: घरफोडी करणाऱ्या आरोपीला छत्तीसगडमधून केले जेरबंद..
▪️3 लाखांची चोरीची रोकड जप्त..

मुख्य संपादक: श्री. तुळशीराम जांभुळकर
चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : चंद्रपूर येथील फिर्यादी सौ. राकेश अवघडे (वय 44 वर्षे), रा. डी. एस. के. ग्रीन कॉलनी, दाताळा चंद्रपूर यांनी त्यांच्या बस स्टैंड जवळ पॅलेस हॉटेल मागे असलेल्या ऑफिसमधून अज्ञात चोरट्याने ₹6,00,000/- रोख रक्कम चोरी केल्याची तक्रार पोलीस स्टेशन रामनगर येथे दिली होती. सदर प्राप्त तक्रारीच्या आधारे पोलीस स्टेशन रामनगर येथे अप. क्र. 956/2026, कलम 331 (4) भारतीय न्याय संहिता, 2023 अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्याचा सखोल तपास करण्यासाठी मा. श्री. आयुष नोपानी, पोलीस अधीक्षक, चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. अमोल काचोरे यांनी एक विशेष तपास पथक तयार केले. सदर तपास पथकाने तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि अत्यंत कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारे संशयित आरोपी वलेश कुमार हल्बा उर्फ बुवारिया (वय 38 वर्षे), रा. रेंगाकठेरा, पोस्ट डोंगरगाव, जि. राजनांदगाव (छत्तीसगड) याचा शोध घेतला आणि त्याला छत्तीसगड राज्यातून यशस्वीरीत्या ताब्यात घेतले.
ताब्यात घेतलेल्या आरोपीकडे पोलीस पथकाने सखोल व कसून चौकशी केली असता त्याने सदर गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीच्या कबुलीजबाबावरून पंचांसमक्ष त्याच्या ताब्यातून चोरीच्या रकमेपैकी ₹3,00,000/- (अक्षरी रुपये तीन लाख फक्त) इतकी रोख रक्कम जप्त करण्यात आली. चौकशीदरम्यान आरोपीने दि. 27/07/2026 रोजी चंद्रपूर शहरातील बसस्थानक परिसरातील एका कार्यालयातून सदर ₹6,00,000/- रोख रक्कम चोरी केल्याची स्पष्ट कबुली दिली आहे. आरोपीकडून चोरीच्या एकूण रकमेपैकी ₹3,00,000/- रोख रक्कम हस्तगत करण्यात आली असून उर्वरित रकमेचा शोध पोलीस पथकाकडून सुरू आहे. आरोपीस पुढील तपास व कायदेशीर कारवाईसाठी पोलीस स्टेशन रामनगर यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदर धडक कारवाई श्री. आयुष नोपानी, पोलीस अधीक्षक, चंद्रपूर व श्री. ईश्वर कातकडे, अपर पोलीस अधीक्षक, चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात सपोनि योगेश हिवसे, पोउपनि विनोद भुरले, पोउपनि सुनील गौरकर, पोहवा सतीश आवठारे, पोहवा इम्रान खान, पोहवा लालू यादव, पोहवा संदीप, पोहवा हिरालाल गुप्ता, पोअं. किशोर वाकडे व पोअं. शशांक बदाम यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.



