आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

◼️दुष्काळ जाहीर, मग पंचनाम्याचा फार्स कशासाठी?

धानपिक अजून हिरवे म्हणून नुकसान नाही? तलाव - बोड्या कोरड्या, पिके गर्भात ; शेतकऱ्यांचा संतप्त सवाल - " आज जिवंत आहे ; उद्या हातात येईल यांची हमी कोण देणार? "

धनराज सरपाते – सिंदेवाही तालुका प्रतिनिधी

सिंदेवाही 🙂इंडिया २४ न्युज )दि.२आक्टोबर
कमी पावसामुळे दुष्काळाची घोषणा झाली, मात्र शेतकऱ्यांच्या पदरात मदत पडण्याआधीच पंचनाम्याचा अडसर उभा राहिला आहे. सध्या शेतात धनाचे पीक हिरवेगार दिसत असल्याने प्रत्यक्ष नुकसान दिसत नसल्याचे कारण पुढे केले जात आहे. मात्र, हे हिरवे पीक शेतकऱ्यांच्या घरात धान्य म्हणून पोहोचेलच याची काय खात्री? असा थेट सवाल चंद्रपूर जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी करीत आहेत.

चंद्रपूर जिल्ह्यात यंदा पावसाने शेतकऱ्यांची मोठी कोंडी केली आहे. तलाव, बोड्या आणि अन्य जलसाठे अपेक्षित पातळीवर भरलेले नाहीत. उपलब्ध पाण्याचा जुगाड करून शेतकऱ्यांनी धान्याची पिके कशीबशी तगवली आहेत. कुणी विहिरीचे पाणी घेतले, कुणी मोटार लावली तर कुणी इतर मार्गाने पाण्याची व्यवस्था केली. त्यासाठी अतिरिक्त पैसा आणि श्रम खर्च झाले.

मात्र या सगळ्या प्रयत्नानंतर आज शेतात पीक उभे आहे म्हणून “नुकसान झाले नाही ” असा निष्कर्ष काढणे म्हणजे शेतकऱ्याच्या संघर्षाकडे डोळेझाक करण्यासारखे आहे. अशी भावना शेतकरी व्यक्त करीत आहेत.

▪️ पिक हिरवे दिसते;पण भवितव्य काळवंडलेले!

धान पीक अद्याप महत्त्वाच्या वाढीच्या टप्प्यात आहे. पुढील काळात त्याला मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज भासणार आहे. पाणीच उपलब्ध नसेल तर पिकाचे पुढील वाढीचे टप्पे, दाणे भरणे आणि अंतिम उत्पादन यावर मोठा परिणाम होऊ शकतो. आज पंचनामा झाला आणि शेतात पीक उभे दिसले. तर उद्या पाणी अभावी उत्पादन घटले किंवा पीक अपेक्षित आले नाही, तर त्या नुकसानीची नोंद कोण करणार?

हा प्रश्न एका शेतकऱ्याचा नसून हजारो धान उत्पादकांच्या भवितव्याचा प्रश्न आहे-

” शेतकरी पिके वाचवतोय, नुकसान लपवत नाही!” शेतकऱ्यांचा युक्तिवाद स्पष्ट आहे –
“आम्ही पिके जिवंत ठेवण्यासाठी धडपड करतोय, त्याचा अर्थ आमचे नुकसान झालेले नाही असा होत नाही.”

पिकाला पाणी देण्यासाठी झालेला अतिरिक्त खर्च, जलसाठ्याची दयनीय अवस्था आणि पुढील काळातील पाण्याची अनिश्चितता यांचा विचार पंचनामाच्या वेळी केला जावा. अशी मागणी शेतकऱ्याकडून होत आहे.

▪️ दुष्काळ शासनाने जाहीर केला; मग मदतीसाठी पुन्हा पुराव्याची परीक्षा कशाला?

दुष्काळ जाहीर करण्यासाठी शासनाने पावसाची परिस्थिती आणि इतर संबंधित निकषांचा विचार केला असेल, तर त्याच दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना मदत देताना प्रत्यक्ष परिस्थितीचा व्यापक विचार करण्याची गरज आहे, असे शेतकरी सांगतात.

” दुष्काळ जाहीर केला आहे, पाण्याची टंचाई आहे, जलसाठे रिकामी आहे आणि पिक अद्याप कणसात आलेले नाही. मग आज शेतात हिरवे पीक दिसते म्हणून नुकसान भरपाई थांबविण्याचा आधार काय? ” असा सवाल उपस्थित होत आहे.

▪️ पंचनामा आजचा की नुकसान उद्याचे?

शेतकऱ्यांच्या मते नुकसान मोजण्याची घाई न करता उत्पादनाचे वास्तव समोर येईपर्यंत परीस्थितीचा आढावा घेतला पाहिजे.

कारण धानाचे पिक शेतात उभे असणे आणि अपेक्षित उत्पादन मिळणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.

▪️रोपे जिवंत आहेत म्हणजे पिक वाचले, असे समिकरण शेतकऱ्यांना मान्य नाही.

आज रोपे हिरवी आहेत ; पण त्यांना पाणी मिळाले नाही तर उद्या कणसे येतील का? कणसे आली तर दाणे भरतील का? आणि दाणे भरले तरी अपेक्षित उत्पादन मिळेल का? या प्रश्नांची उत्तरे सध्या कुणाकडेही नाही.

“पंचनाम्यापेक्षा शेतकऱ्याचे वास्तव पहा!”

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शासनाने पंचनाम्याच्या कागदी प्रक्रियेपेक्षा प्रत्यक्ष परिस्थितीचा विचार करून मदतीचे निकष ठरवावेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

शेतकऱ्यांनी पिके वाचवण्यासाठी केलेला खर्च, उपलब्ध पाण्याची स्थिती, पिकाची वाढीची अवस्था आणि पुढील काळातील पाण्याची गरज यांचा समावेश नुकसान आकलनात व्हावा, अशी अपेक्षा आहे.

कारण प्रश्न केवळ आज शेतात पिक दिसते की नाही, एवढाच नाही; प्रश्न आहे- हे पिक शेवटी शेतकऱ्याच्या घरात किती धान्य घेऊन जाणार?

आणि जर दुष्काळाची घोषणा झालीच आहे, तर शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत असताना पंचनाम्याच्या चौकटीत त्याला अडवून ठेवायचे किती दिवस?

चंद्रपूर जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्याचा हा सवाल आता शासनाच्या निर्णयाकडे उत्तर मागत आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.