▪️प्राचार्य शाम रामटेके यांचा सेवानिवृत्ती सोहळा उत्साहात संपन्न..

गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ – उज्वल देवनाथ
चामोर्शी – ( इंडिया 24 न्युज ) : यशोधरा विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, चामोर्शी येथील प्राचार्य शाम रामटेके यांचा ३१ वर्षांच्या प्रदीर्घ शैक्षणिक सेवेनंतर सेवानिवृत्ती सत्कार सोहळा विद्यालयाच्या वतीने भावपूर्ण व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. यावेळी पत्नी अरुणा रामटेके यांच्यासह त्यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.
शिक्षक ते प्राचार्य असा दीर्घ प्रवास करताना शाम रामटेके यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासालाही सातत्याने प्राधान्य दिले. आपल्या मनमिळावू स्वभावामुळे त्यांनी विद्यार्थी, पालक आणि समाजातील विविध घटकांशी जिव्हाळ्याचे नाते निर्माण केले. विद्यालयाच्या शैक्षणिक व प्रशासकीय वाटचालीत त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. शैक्षणिक कार्यासोबतच सामाजिक व सांस्कृतिक चळवळींमध्येही ते सक्रिय राहिले आणि आपल्या कार्यातून सामाजिक बांधिलकी जपली.
सेवानिवृत्ती सत्काराला उत्तर देताना रामटेके यांनी आपल्या ३१ वर्षांच्या सेवाकाळातील आठवणींना उजाळा देत विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक आणि सहकाऱ्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. याचवेळी त्यांनी सेवानिवृत्तीनंतर मिळणाऱ्या रकमेतून दोन लाख रुपये सामाजिक कार्यासाठी देण्याची घोषणा केली. त्यांच्या या आर्थिक सहकार्यातून कायद्याचे शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रवेशपूर्व प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. ग्रामीण व गरजू विद्यार्थ्यांना कायद्याच्या उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
सेवानिवृत्ती सोहळ्यात शिक्षकांसोबतच विद्यार्थ्यांनीही मनोगत व्यक्त करत रामटेके यांच्या सहवासातील आठवणींना उजाळा दिला. शिक्षक, कर्मचारी, माजी विद्यार्थी आणि उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या प्रदीर्घ शैक्षणिक सेवेचा, विद्यार्थ्यांप्रती असलेल्या तळमळीचा तसेच सामाजिक क्षेत्रातील योगदानाचा गौरव केला.
कार्यक्रमाच्या समारोपानंतर एक भावनिक क्षण अनुभवायला मिळाला. विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी रामटेके यांना अत्यंत सन्मानपूर्वक निरोप देत त्यांच्या निवासस्थानापर्यंत सोबत केली. ३१ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सहकाऱ्यांनी दिलेल्या या जिव्हाळ्याच्या निरोपामुळे सेवानिवृत्ती सोहळ्याची सांगता भावपूर्ण वातावरणात झाली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे नवनियुक्त प्राचार्य राजू धोडरे होते. प्रमुख अतिथी म्हणून राहुल लोकविकास मंडळाचे सचिव विवेकजी सहारे, कोषाध्यक्ष वकटुजी उंदीरवाडे, प्रशासकीय अधिकारी मा. विनोद हाटकर, ॲड. बोधी रामटेके, प्रा. प्रेमानंद वालदे, रेवनदासजी उंदीरवाडे तसेच इतिहास मेश्राम यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनी रामटेके यांच्या प्रदीर्घ शैक्षणिक व सामाजिक कार्याचा गौरव करत त्यांना पुढील आनंदी, निरोगी आणि सामाजिकदृष्ट्या सक्रिय आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रवीण गव्हारे यांनी केले, तर आभार प्रदर्शन जयश्री कोठारे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रविण नैताम, गुरु सातपुते, लोकनाथ दूधबळे, निलेश क्षिरसागर, अमोल उंदिरवाडे, प्रा. प्रदीप भांडेकर, दिपाली घोंगडे, सचिन पिपरे तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी लक्ष्मण गव्हारे, माणिक चंद्रागडे, अनिल बोरुले, आनंद रामटेके, आशाताई उंदीरवाडे आणि करुणा रामटेके यांनी विशेष सहकार्य केले.



