▪️हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानांतर्गत मूल बसस्थानकाचे आटोपले तिसरे मुल्यांकन..

डॉ. आनंदराव कुळे
मुल तालुका प्रतिनिधी
मो. क्र. ९४०३१७९७२७
मुल – ( इंडिया २४ न्यूज ) : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे राज्यातील बसस्थानकावर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान राबविण्यात येत आहे.
या अभियानात आज १९ नोव्हेंबर रोजी ‘अ’ वर्गात येणाऱ्या चंद्रपूर विभागातील मूल बसस्थानकाचे सर्वेक्षण करून तिसरे मूल्यांकन करण्यात आले. प्रादेशिक मूल्यांकन समितीमधील अमरावती येथील प्रादेशिक व्यवस्थापक रोहन भानुदास पलंगे, अमरावती येथील राकेश सुरेश पवार वरिष्ठ सांख्यिकी अधिकारी , जागृत ग्राहक राजा नागपूर विदर्भ प्रांत अध्यक्ष व प्रवासी संघाचे अध्यक्ष दीपक देशपांडे तसेच दै. लोकमत समाचार चे मूलचे पत्रकार चंद्रकांत मनियार यांच्या चार सदस्यीय समितीने मूलच्या बसस्थानकाची पाहणी केली.
या अभियानात ‘अ’ वर्गातील बसस्थानकाचे चार वेळा मूल्यांकन होणार होते. त्यापैकी आजचे तिसरे मुल्यांकन होते. यानंतर पुन्हा एकदा मूल्यांकन होणार आहे.
महाराष्ट्र राज्यातून प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या बसस्थानकला एक कोटी रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे.तर द्वितीय क्रमांक पटकावणाऱ्या बसस्थानकला पन्नास लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. त्यामुळे या स्पर्धेत दिवसेंदिवस अधिकाधिक चुरस निर्माण झाली आहे.
मूल बसस्थानकाचे मूल्यांकन करताना समितीतर्फे बसस्थानक, परिसरासह पुरुष व महिलांच्या स्वच्छतागृहाची स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची सोय, दिशादर्शक सुचनाफलक , बसस्थानकाची रंगरंगोटी, बसस्थानकाचे नाव व फलाटावरील फेरीनिहाय गावाचे फलकांचे निरीक्षण केले. बसस्थानकावरील चौकशी खिडकीच्या बाजूला वेळापत्रक, उद्घोषणा यंत्रणा, प्रवाशांच्या तक्रारी, सूचना संबंधित बसस्थानकासह आगार व आगार व्यवस्थापकांचे भ्रमणध्वनी क्रमांक, चालक व वाहकांचे विश्रांतीगृह, बसस्थानकावरील चौकशी, आरक्षण सोयीसुविधा, विद्यार्थी व सर्वसामान्य व्यक्तींसाठी मासिक पास खिडकीची सुविधा, रेलिंग, वाणिज्य आस्थापना आणि पार्किंग व्यवस्थेबद्दल सर्वेक्षण करण्यात आले , यावेळी स्वच्छता आणि बगीचावर भर देण्यात आला होता.
यानंतरही अंतिम मुल्यांकन होऊन नंतर निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
आजवर प्रत्येक परिक्षणात आढळलेल्या उणीवा भरुन काढत आपले बसस्थानक अधिकाधिक सोयीसुविधांनी युक्त असावे यासाठी स्थानिक पातळीवर महामंडळाचे कर्मचारी व जनता सहकार्य करीत असल्याचे परिक्षण समितीला आढळून येत असून या स्पर्धेत मूलचे बसस्थानक दिवसेंदिवस वरचढ ठरेल यासाठी महामंडळ अधिकारी प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे प्रत्येक परिक्षणात आपले बसस्थानक एकेक टप्पा गाठत यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे दिसत असून त्याचे सौंदर्य वाढविण्यासाठी बांधकाम व दुरुस्ती कामे प्रगतीपथावर असल्याचे निदर्शनास आले आहे. प्रशासनाला प्रवाशांची साथ लाभली तर आपले बसस्थानक स्वच्छ व सुंदर राहील आणि ते स्पर्धेत अव्वल स्थानावर सुद्धा पोहोचू शकेल अशी अपेक्षा मुल्यांकन समितीचे वतीने व्यक्त केली गेली आहे.
पार्किंग व्यवस्था व बाग बगीचा याबाबत प्रशासनाने विचार करून जनतेच्या सहभागातून तो कसा विकसीत करता येईल यासाठी प्रयत्न करावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
या परिक्षणाचे वेळी परिवहन महामंडळाचे चंद्रपूर आगारातील अधिकारी वर्ग व मूल बसस्थानक नियंत्रक व प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



