▪️नागपूर विद्युत लोकपालपदी श्री. भालचंद्र खंडाईत यांची निवड..

राज जांभुळकर : मुख्य कार्यकारी संपादक
नागपूर – ( इंडिया 24 न्युज ) : दि. १ जानेवारी २०२६: विद्युत क्षेत्रात सुमारे ३५ वर्षांचा अनुभव असणारे तसेच महावितरणचे सेवानिवृत्त संचालक श्री. भालचंद्र खंडाईत यांनी विदर्भ व मराठवाडा कार्यक्षेत्र असलेल्या नागपूर विद्युत लोकपाल पदाचा नुकताच कार्यभार स्वीकारला. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने त्यांची नियुक्ती केली आहे.
श्री. भालचंद्र खंडाईत हे भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यांतील सानगडी येथील रहिवासी असून त्यांनी तत्कालीन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात दि. २३ ऑगस्ट १९८९ रोजी चंद्रपूर परिमंडलातील नवरगाव वितरण केंद्रात कनिष्ठ अभियंता म्हणून विद्युत क्षेत्रातील कार्यकाळास सुरुवात केली. त्यानंतर पदोन्नतीद्वारे महावितरणचे कार्यकारी अभियंता म्हणून श्री. खंडाईत यांनी नागपूर जिल्ह्यात, अधीक्षक अभियंता व मुख्य अभियंता म्हणून मुंबई मुख्यालयात काम केले आहे. महावितरणचे नागपूर प्रादेशिक संचालक म्हणून त्यांनी प्रामुख्याने गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भागासह विदर्भामध्ये नवीन वीजजोडणी व विद्युतीकरणाची अंमलबजावणी प्रभावीपणे केली. तसेच महावितरणचे संचालक (प्रकल्प) म्हणून श्री. भालचंद्र खंडाईत यांनी राज्यभरात राज्य व केंद्र शासनाच्या विविध प्रकल्पांना व योजनांना गती दिली.
महावितरणचे संचालक म्हणून सेवानिवृत्त झाल्यानंतर श्री. भालचंद्र खंडाईत यांची विद्युत नियामक आयोगाने नागपूर विद्युत लोकपालपदी नियुक्ती केली होती. या पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर श्री. खंडाईत यांची विद्युत लोकपाल म्हणून आयोगाकडून पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे.



