◼️ चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील तेंदु मजुरांना बोनसची प्रतीक्षा ◼️

धनराज सरपाते – सिंदेवाही तालुका प्रतिनिधी
सिंदेवाही ( इंडिया २४ न्यूज):
चंद्रपूर व गडचिरोली हे दोन्ही जिल्हे मोठ्या प्रमाणावर जंगलव्याप्त असून येथिल हजारो कुटुंबाची उपजीविका वनउत्पादनावर अवलंबून आहे. विशेषतः तेंदुपता संकलन व मोहफुले गोळा करणे हा येथील मजुरांसाठी हंगामी रोजगाराचा स्तोत्र आहे.
सन २०२५ च्या तेंदु हंगामात स्थानिक मजुरांची मोठ्या प्रमाणावर तेंदुपता संकलनाचे काम केले. दरवर्षीप्रमाणे या कामाच्या बदल्यात मजुरीसोबत प्रोत्साहनपर मजुरी ( बोनस ) देखील दिला जातो. साधारणपणे नोव्हेंबर ते जानेवारी दरम्यान हा बोनस मजुरांच्या बँकखात्यात जमा केला जातो.
मात्र यावर्षी फेब्रुवारी महिना सुरु होऊनही अनेक तेंदु संकलन करणाऱ्या मजुरांच्या बँकखात्यात बोनस जमा झालेला नाही. त्यामुळे मजुरांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून ते बोनसची आतुरतेने वाट पाहत आहेत.
स्थानिक मजुरांच्या म्हणण्यानुसार, बोनसवरच त्यांचा कुटूंबाचा खर्च, मुलाचे शिक्षण व इतर आवश्यक गरजा अवलंबून असतात. त्यामुळे बोनस वितरणात होणारा विलंब त्यांच्या आर्थिक अडचणी वाढवत आहे. संबंधित विभागाने लवकरात लवकर बोनस जमा करून मजुरांना दिलासा द्यावा. अशी मागणी मजुरांकडून होत आहे.



