◼️ सिंदेवाहीत अवैद्य उत्खननावर कारवाई !! मध्यरात्री धाड टाकून पाच ट्रॅक्टर जप्त; तालुक्यात खळबळ !!

धनराज सरपाते- सिंदेवाही तालुका प्रतिनिधी
सिंदेवाही (इंडिया २४ न्यूज) दि.२१/०२/२०२६
सिंदेवाही तालुक्यात अनेक महिन्यापासून सुरू असलेल्या अवैद्य रेती व मुरूम उत्खननाच्या चर्चांना अखेर प्रशासनाने उत्तर दिले आहे. दिनांक २० फेब्रुवारी २०२६ रोजी मध्यरात्री अचानक धाड टाकत प्रशासनाने रेतीने भरलेले पाच ट्रॅक्टर जप्त केले.
या कारवाईचे विशेष महत्त्व म्हणजे चिमूर येथील उपविभागीय दंडाधिकारी स्वतः मैदानात उतरले होते. त्याच्या नेतृत्वाखाली नायब तहसीलदार व तलाठी यांनी सापळा रचून ही कारवाई केली. जप्त करण्यात आलेले ट्रॅक्टर तहसील कार्यालयात उभे करण्यात आले असून, पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
तालुक्यातील नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणावर रेती उपसा सुरू असल्याच्या चर्चा गावागावात होत होत्या. मात्र, प्रत्यक्ष कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये दबक्या आवाजात नाराजी व्यक्त होत होती. एका रात्रीत पाच ट्रॅक्टर पकडले गेल्याने रेती तस्करांचे धाबे दणाणले असून तालुक्यात खळबळ उडाली आहे.
काही जप्त वाहनांमागे राजकीय वरदहस्त असल्याची चर्चा रंगत असली तरी त्यास अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. त्यामुळे कारवाई भोवती विविध तर्कवितर्क लावले जात आहेत.
नागरिकांमध्ये आता एकच चर्चा सुरू आहे, जर अशी मोहीम सातत्याने राबवली तर, आणखी कितीतरी अवैध ट्रॅक्टर सापडू शकतात. ही कारवाई नियमितपणे सुरू राहणार की काही दिवसातच परिस्थिती जैसे थे होणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.



