आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

◼️स्थानिक प्रशासन झोपेत; चिमूरच्या अधिकाऱ्याची थेट एन्ट्री

! सिंदेवाहीत वाळू माफीयांना झटका !!

 

धनराज सरपाते- सिंदेवाही तालुका प्रतिनिधी

सिंदेवाही ( इंडिया २४ न्यूज )
सिंदेवाही तालुक्यात अनेक महिन्यापासून सुरू असलेल्या अवैध्य रेती व मुरमाच्या उपशावर अखेर प्रशासनाने धडक कारवाई केली आहे. दिनांक 20 फेब्रुवारी २०२६ च्या मध्यरात्री चिमूर येथील उपविभागीय दंडाधिकारी यांनी स्वतः पथकासह मैदानात उतरून पाच रेतीने भरलेले ट्रॅक्टर जप्त केले. या कारवाईमुळे वाळूमाफियामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

स्थानिक प्रशासन झोपेत होते काय?

सिंदेवाही तालुक्यातील नद्यामधून रेतीची चोरी ही काही नवीन बाब नाही. मात्र स्थानिक महसूल विभागाच्या नाकाखाली हा प्रकार वर्षानुवर्षे सुरू असल्याचा आरोप नागरिकाकडून केल्या जात आहे. अनेक महिन्यापासून राजरोसपणे अवैध उपसा सुरू असताना स्थानिक तहसील प्रशासन नेमके काय करत होते, असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे.

रात्रीची धडक कारवाई

उपविभागीय अधिकाऱ्यांना सिंदेवाहीतील अवैद्य उत्खननाची माहिती मिळताच, त्यांनी स्थानिक यंत्रणेवर अवलंबून न राहता स्वतः सापळा रचला. नायब तहसीलदार तुमराम व दोन तलाठी यांना सोबत घेऊन 20 फेब्रुवारी च्या रात्री कारवाई करण्यात आली. रेतीची वाहतूक करताना पाच ट्रॅक्टर रंगे हात पकडण्यात आले. सध्या ही वाहने तहसील कार्यालयाच्या आवारात उभी करण्यात आली आहेत.

राजकीय कनेक्शनची चर्चा

सूत्राच्या माहितीनुसार जप्त करण्यात आलेल्या पाच ट्रॅक्टरपैकी काही वाहनांचा संबंध सत्ताधारी तसेच विरोधी पक्षातील स्थानिक नेत्यांशी असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. त्यामुळे या कारवाईला राजकीय वळण लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

महसूल विभागाची नाचक्की:

चिमूर येथील अधिकाऱ्यांना येऊन कारवाई करावी लागणे, ही स्थानिक महसूल विभागासाठी नाचक्कीची बाब मानली जात आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात अवैध उपसा सुरू असताना स्थानिक पातळीवर ठोस कारवाई का झाली नाही, हा प्रश्न आता अधिक तिव्र झाला आहे.

एका रात्रीची चमकोगिरी की सातत्यपूर्ण मोहीम?

नागरिकांमध्ये दोन वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत.
• ही कारवाई सातत्याने सुरू राहून, वाळू माफियावर खरोखर लगाम बसणार काय?
• की काही दिवसांनी राजकीय दबावाखाली जप्त ट्रॅक्टर पुन्हा मोकळे होणार?
विशेष म्हणजे कारवाईनंतरही काही भागात रात्री उशिरा आणि पहाटेच्या सुमारास रेती वाहतूक सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे “दोन दिवस कारवाई आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा चोरी” असे समीकरण कायम राहणार का? याकडे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पुढे काय?

ही कारवाई तहान लागल्यावर विहीर खोदण्यासारखी ठरणार, की खऱ्या अर्थाने अवैध्य उत्खननांविरोधात निर्णायक लढाईची सुरुवात ठरणार, हे येणारा काळच ठरवेल. मात्र सध्या तरी सिंदेवाही तालुक्यातील वाळू माफियाचे धाबे दणाणले असून स्थानिक राजकारण चांगलेच तापले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.