▪️तीन शाळांसाठी स्वतंत्र शिक्षकांच्या नियुक्तीची मागणी; भाकपाकडून बीडीओंना निवेदन..

गढ़चिरौली जिल्हा ब्युरो चीफ: उज्वल देवनाथ
बारसागंडी – ( इंडिया 24 न्युज ) : सिरोंचा तालुक्यातील ग्रामपंचायत जप्राबाद अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जप्राबाद, मोकेला व टेकडा तल्ला या तीन शाळांसाठी केवळ एकच शिक्षक कार्यरत असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणासह सुरक्षिततेचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय कम्युनिस्ट पक्ष (भाकपा) सिरोंचा तालुका सचिव रवि बारसागंडी यांनी पंचायत समिती सिरोंचाचे गटविकास अधिकारी (बीडीओ) यांना निवेदन सादर करून तातडीने स्वतंत्र शिक्षकांची नियुक्ती करण्याची मागणी केली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, शिक्षकांच्या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांवर योग्य देखरेख होत नसून अलीकडेच एका विद्यार्थ्याचा अपघात होऊन त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. या विद्यार्थ्याच्या डोक्यावर तीन टाके घालावे लागल्याने पालक व ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
रवि बारसागंडी यांनी प्रशासनाकडे चार प्रमुख मागण्या केल्या आहेत. त्यामध्ये जप्राबाद, मोकेला व टेकडा तल्ला या तिन्ही शाळांसाठी स्वतंत्र शिक्षकांची तात्काळ नियुक्ती करणे, विद्यार्थ्याच्या दुखापतीची सखोल चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करणे, जखमी विद्यार्थ्याला आवश्यक वैद्यकीय मदत व आर्थिक सहाय्य देणे आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी सर्व शाळांमध्ये पुरेसे शिक्षक उपलब्ध करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची हमी देणे यांचा समावेश आहे.
याबाबतचे निवेदन मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद गडचिरोली, मा. शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद गडचिरोली तसेच मा. गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती सिरोंचा यांनाही पाठविण्यात आले असून या प्रकरणात तातडीने चौकशी करून योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.



