आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

◼️ सिंदेवाहीत अपघाताची मालिका; गतिरोधकासाठी युवक काँग्रेसचा सात दिवसाचा अल्टिमेटम

 

धनराज सरपाते- सिंदेवाही तालुका प्रतिनिधी

सिंदेवाही (इंडिया २४ न्यूज) दि.२४/०२/२०२६
सिंदेवाही शहरातून जाणाऱ्या राज्य महामार्ग क्रमांक ९ वरील शिवाजी महाराज चौक ते देवयानी इंटरनॅशनल स्कूल दरम्यान रस्ता रुंदीकरणानंतर वाढलेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर युवक काँग्रेस सिंदेवाही तालुका कमिटी आक्रमक झाली आहे. या मार्गावर तातडीने गतिरोधक बसविण्याच्या मागणीसाठी दिनांक २४ फेब्रुवारी २०२६ रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग, तहसील कार्यालय आणि पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले. सात दिवसाच्या आत मागणी पूर्ण न झाल्यास चक्काजाम आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

रस्ता रुंदीकरणानंतर अपघातात वाढ

सिंदेवाही शहरातून जाणाऱ्या राज्य महामार्ग क्रमांक ९ वरील शिवाजी महाराज चौक ते देवयानी इंटरनॅशनल स्कूल पर्यंतचे रस्त्याचे अलीकडे सिमेंट काँक्रीटीकरण व रुंदीकरण करण्यात आले. रस्ता रुंद व गुळगुळीत झाल्यानंतर वाहनाचा वेग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मात्र आवश्यक त्या ठिकाणी गतिरोधक बसविण्यात आले नसल्याचा आरोप युवक काँग्रेसने केला आहे.
परिणामी या मार्गावर दर एक-दोन दिवसाआड अपघात होत असून नागरिकाचा जीव धोक्यात आला आहे. यापूर्वी महाजन गॅस एजन्सी जवळ झालेल्या भीषण अपघातात एका शिक्षकाचा मृत्यू झाला होता. तरीही प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष दिले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

गजबजलेला परिसर, नागरिकांमध्ये भीती

शिवाजी महाराज चौक व जुने बस स्थानक परिसर नेहमीच गजबजलेला असतो. येथे शालेय विद्यार्थी महिला व ज्येष्ठ नागरिकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते, वारंवार होणाऱ्या अपघातामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
स्थानिक नागरिकांनी अनेकदा गतिरोधक बसविण्याची मागणी करूनही सामाजिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याने, युवक काँग्रेसने आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे.

सात दिवसांचा अल्टिमेटम

युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष अभिजीत मुप्पीडवार यांनी निवेदनाद्वारे प्रशासनाला इशारा दिला की, विकासासाठी रुंद रस्ते आवश्यक असले तरी नागरिकांचा जीव अधिक मौल्यवान आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे नागरिकाचा जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
सात दिवसाच्या आत दर्जेदार गतिरोधक बसविण्यात आले नाहीत, तर युवक काँग्रेसच्या वतीने रस्त्यावर बसून तीव्र चक्काजाम आंदोलन करण्यात येईल. आंदोलनातून उद्भवणाऱ्या कोणत्याही परिस्थितीला सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार राहील असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
या निवेदनामुळे सिंदेवाहीच्या राजकीय व सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली असून, प्रशासन पुढे काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.