◼️बँक ऑफ महाराष्ट्र वासेरा शाखा स्थलांतरास नागरिकांचा विरोध

धनराज सरपाते- सिंदेवाही तालुका प्रतिनिधी
सिंदेवाही (इंडिया २४ न्यूज) दि.२४/०२/२०२६
सिंदेवाही तालुक्यातील वासेरा येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखा, सिंदेवाही येथे स्थलांतरित करण्याचे हालचाली सुरू असल्याची माहिती समोर येताच परिसरात खळबळ उडाली आहे. मागील ३२ वर्षापासून कार्यरत असलेल्या या शाखेत सुमारे पाच हजाराहून अधिक ग्राहक असून, २०० महिला बचत गट व अनेक शासकीय खात्याचे व्यवहार इथूनच चालतात. शाखेचे स्थलांतर रद्द करावे या मागणीसाठी वासेरासह आठ गावातील सुमारे ६०० नागरिकांनी स्वाक्षरीयुक्त निवेदन पुणे येथील प्रधान कार्यालयाला पाठविले आहे. ग्रामीण भागातील नागरिकांची गैरसोय होणार असल्याने निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी मागणी करण्यात आली आहे या संदर्भात आमदार विजय वडेट्टीवार, आमदार बंटी भांगडिया तसेच संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. स्थलांतराचा निर्णय न बदलल्यास आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.



