◼️ सिंदेवाही – लोनवाही मार्गावर महिलांच्या आत्मविश्वासाचा जल्लोष; भव्य महिला बाईक रॅलीने दिला सशक्तीकरणाचा संदेश

धनराज सरपाते- सिंदेवाही तालुका प्रतिनिधी
सिंदेवाही:( इंडिया २४ न्यूज) दि. ८/३/२०२६
जागतिक महिला दिनानिमित्त सिंदेवाही येथे महिलांच्या सशक्तीकरणाचा प्रभावी संदेश समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी भव्य महिला बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. रविवार दिनांक ८ मार्च २०२६ रोजी सकाळी १० वाजता शिवाजी चौक येथून या उत्साही रॅलीला शानदार सुरुवात झाली.
महिलांच्या उत्साहाने भरलेली ही रॅली, शिवाजी चौक, बाजार चौक, महात्मा फुले चौक, राम मंदिर चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, सिद्धार्थ चौक, हेटीवार्ड, लोणवाही, पोलीस स्टेशन मार्गे पुन्हा शिवाजी चौक येथे येऊन संपन्न झाली.
या भव्य रॅलीमध्ये ५०० हून अधिक महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आत्मविश्वास आणि स्वावलंबनाचा अनोखा संदेश दिला. महिलांच्या जोशपूर्ण उपस्थितीमुळे संपूर्ण शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
याप्रसंगी सिंदेवाही पोलीस स्टेशनचे ठाणेदार कांचन पांडे, एपीआय राणी भोंडे मॅडम, तसेच त्यांचा संपूर्ण पोलीस स्टॉफ प्रमुख उपस्थित होता.
“महिला दिन विशेष” उपक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेली सिंदेवाही- लोनवाही महिला बाईक रॅली ही महिलांच्या आत्मविश्वास स्वावलंबन आणि सामाजिक सहभागाचे प्रतीक ठरली. या रॅलीच्या माध्यमातून महिलांच्या हक्काविषयी जनजागृती करण्यात आली आणि समाजात महिलासशक्तीकरणाचा ठाम संदेश देण्यात आला.



