ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️टेकडा ताला गावातील पेयजल योजना बंद; नळ जोडण्या ठरल्या शोभेची वस्तू : भाकपा(CPI)

 

*🔸श्री. उज्वल देवनाथ*
*🔸 गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ*
*🔸 मो नं. 7499963831*

गडचिरोली – ( इंडिया 24 न्युज ) : जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील जाफराबाद ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या टेकडा ताला गावात मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत उभारण्यात आलेली पाणी टाकी गेल्या काही वर्षांपासून बंद अवस्थेत आहे. शासनाने लाखो रुपये खर्च करून ही योजना उभारली असली तरी प्रत्यक्षात ती बंद पडल्यामुळे गावातील नळ जोडण्या केवळ शोभेची वस्तू बनल्या आहेत. परिणामी गावातील नागरिकांना आजही शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
गावातील अनेक घरांमध्ये नळ जोडण्या देण्यात आल्या असल्या तरी पाणीपुरवठा बंद असल्यामुळे नागरिकांना विहीर, बोअरवेल किंवा इतर उपलब्ध स्त्रोतांवर अवलंबून राहावे लागत आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत पाण्याची टंचाई अधिक तीव्र होत असल्याने विशेषतः महिला, वृद्ध आणि रुग्णांना पाण्यासाठी दूरवर जावे लागत असून त्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पिण्याच्या पाण्यासारखी मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याने गावकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
या गंभीर समस्येकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे. भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे जिल्हा सहसचिव कॉ. सचिन मोतकुरवार यांच्या मार्गदर्शनाखाली भाकपा सिरोंचा तालुका सचिव कॉ. रवी बरसांगडी यांनी शासन आणि संबंधित विभागाकडे मागणी केली आहे की, टेकडा ताला गावातील मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत उभारलेली बंद पडलेली पाणी टाकी त्वरित सुरू करून गावातील नागरिकांना नियमित व स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे.
स्थानिक नागरिकांची भाकपा कडे अपेक्षा
टेकडा ताला गावातील स्थानिक नागरिकांनी भारतीय कम्युनिस्ट पार्टीकडे अपेक्षा व्यक्त केली आहे की, गावातील पिण्याच्या पाण्याच्या समस्येचे तातडीने निराकरण करण्यासाठी भाकपाने प्रशासनाकडे ठोस पाठपुरावा करावा आणि बंद पडलेली पेयजल योजना पुन्हा सुरू करून गावकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.