▪️धाबा येथील संत परमहंस कोंडय्या महाराज देवस्थानाला आता ‘ब’ वर्गाचा दर्जा..
▪️आमदार देवराव भोंगळे यांच्या प्रयत्नांचे फलीत..

राज जांभुळकर : मुख्य कार्यकारी संपादक
गोंडपिपरी – ( इंडिया 24 न्युज ) : २७ विदर्भ आणि तेलंगणा राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गोंडपिपरी तालुक्यातील श्रीक्षेत्र धाबा येथील श्री संत परमहंस कोंडय्या महाराज देवस्थान संस्थानला राज्य शासनाने ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा बहाल केला आहे.
आमदार देवराव भोंगळे यांनी यासंदर्भात शासनाकडे केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि पत्रव्यवहाराला मोठे यश आले असून, यामुळे संतनगरी धाबा च्या सर्वांगीण विकासाचा मार्ग सुकर झाला आहे.
राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने २७ मार्च २०२६ रोजी यासंदर्भातील अधिकृत शासन निर्णय निर्गमित करीत ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रास्थळ योजनेंतर्गत यापूर्वी ‘क’ वर्गात असलेल्या या देवस्थानाची श्रेणी आता ‘ब’ वर्गात वाढवण्यात आली आहे.
धाबा हे ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्व असलेले एक आध्यात्मिक नगर आहे. येथे संत परमहंस कोंडय्या महाराज यांचे जागृत मंदिर असून, दरवर्षी याठिकाणी सहा दिवसीय भव्य यात्रा भरते. या यात्रेसाठी महाराष्ट्र आणि शेजारील तेलंगणा राज्यातून लाखोंच्या संख्येने दर्शनार्थी येत असतात. देवस्थानाला ‘ब’ वर्ग दर्जा मिळाल्यामुळे आता या ठिकाणी भक्त निवास, पिण्याचे पाणी, रस्ते आणि इतर पायाभूत सोयी-सुविधांसाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध होणार आहे.
या आध्यात्मिक तीर्थक्षेत्राचा विकास व्हावा आणि दर्शनार्थींना चांगल्या सोईसुविधा मिळाव्यात, यासाठी आमदार देवराव भोंगळे सातत्यपूर्ण प्रयत्नशील होते. त्यांच्या पाठपुराव्याला आलेल्या या यशामुळे धाबा परिसरातील नागरिक आणि भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून, सर्व स्तरातून आमदार देवराव भोंगळे यांचे आभार मानले जात आहेत.



