◼️ सिंदेवाही तालुक्यात पुन्हा रेती तस्करीचा कहर ; महसूल विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह ?”

धनराज सरपाते- सिंदेवाही तालुका प्रतिनिधी
सिंदेवाही:(इंडिया २४ न्यूज)
सिंदेवाही तालुक्यात अवैद्य रेती तस्करीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. २० फेब्रुवारी २०२६ च्या मध्यरात्री चिमुर येथिल उपविभागीय दंडाधिकारी यांनी पथकासह धाड टाकून नियमबाह्य पद्धतीने रेती वाहतूक करणारे पाच ट्रॅक्टर जप्त केले होते. या धाडसी कारवाईने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती. त्या कारवाईचे सर्वत्र कौतुक झाले, वृत्तपत्रांनीही त्याचा मोठा उहापोह केला. मात्र त्यानंतर काही दिवस उलटताच परिस्थिती पुन्हा “जैसे थे” झाल्याचे धक्कादायक चित्र सिंदेवाही तालुक्यात दिसत आहे.
महसूल विभागावर सवाल?”
सध्या रात्रीच्या वेळी सर्रासपणे रेती वाहतूक करणारे ट्रॅक्टर रस्त्यावर धावताना दिसत आहेत. महसूल विभाग मात्र पूर्णपणे निष्क्रिय असल्याचा आरोप नागरिकाकडून होत आहे. ज्यांच्यावर या सर्व कारवाईची जबाबदारी आहे ते अधिकारी जणू “झोपेचे सोंग” घेत बसलेले आहेत का? असा संतप्त सवाल जनतेतून उपस्थित केला जात आहे.
कठोर कारवाईची मागणी !”
ज्या नदीघाटाचे लिलाव झालेले नाहीत किंवा जिथे लिलाव झालेले आहेत अशा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात होणारा अवैध रेती उपसा थांबवण्यासाठी, महसूल विभागाने तातडीने पावले उचलणे आवश्यक आहे. ज्या महसूल कर्मचाऱ्यांचे हद्दीतून रेती तस्करी होत आहे, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे. संबंधित क्षेत्राची प्रत्यक्ष पाहणी करून दोषीवर गुन्हे दाखल करणे, त्यांच्याकडून आर्थिक दंड वसुल करणे आणि गरज भासल्यास निलंबनाची कारवाई करणे आवश्यक असल्याचे जाणकाराचे मत आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही संशय ?”
या प्रकरणात केवळ खालच्या स्तरावरील कर्मचाऱ्यांनाच नव्हे, तर तालुका व जिल्हास्तरीय वरिष्ठ अधिकाऱ्यानाही या प्रकरणात जबाबदार धरण्यात यावे, अशी ठाम भूमिका मांडत आहेत. कारण वर्षानुवर्ष सुरू असलेली ही रेती तस्करी केवळ खालच्या पातळीवरील निष्क्रियतेमुळेच नव्हे, तर वरच्या पातळीवरील मौन सहमतीमुळेच चालू असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
प्रशासनाची ठिसाळ भुमिका – तस्करांचे मनोबल वाढले ;
खरे पाहता प्रशासनाने ठाम भूमिका घेतली, तर एका रात्रीत या अवैध रेती तस्करीला पूर्णविराम देता येऊ शकतो. मात्र सध्याच्या ढिसाळ भूमिकेमुळे तस्करांचे मनोबल वाढत असून, प्रशासनाचा धाक कमी होत चालल्याचे स्पष्ट दिसत आहे.
नागरिकांचा सवाल ?
आता तरी प्रशासन जागे होणार का? की रेती माफीयाचा सुळसुळात असाच सुरू राहणार? हा प्रश्न सिंदेवाही तालुक्यातील प्रत्येक नागरिकाच्या मनात घर करून बसला आहे.



