आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️जिमलगट्टा पोलिसांची मोठी कारवाई; प्रतिबंधित हुक्का शिशा तंबाखूसह 10.72 लाखांचा मुद्देमाल जप्त..

▪️इनोव्हा कारमधून सुरू होती प्रतिबंधित तंबाखूची वाहतूक; एक संशयित ताब्यात

 

गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ: उज्वल देवनाथ

गडचिरोली – ( इंडिया 24 न्युज ) : गडचिरोली जिल्ह्यात प्रतिबंधित सुगंधित तंबाखूच्या विक्री व वाहतुकीविरोधात जिमलगट्टा पोलिसांनी मोठी कारवाई करत 10 लाख 72 हजार रुपयांचा प्रतिबंधित हुक्का शिशा तंबाखूचा साठा आणि एक चारचाकी वाहन जप्त केले आहे. या प्रकरणी एका संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मडावी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधित तंबाखू, भेसळयुक्त पदार्थ व तत्सम उत्पादनांची विक्री आणि वाहतूक रोखण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी विशेष मोहीम राबविण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, जिमलगट्टा यांनी गोपनीय बातमीदारामार्फत माहिती संकलित केली.

दि. 8 जुलै 2026 रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल एम. मडावी यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार एमएच 24 एएफ 1901 क्रमांकाच्या पांढऱ्या रंगाच्या इनोव्हा वाहनातून जिमलगट्टा ते देवलभेडा (देचलीपेठा परिसर) मार्गावर प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली.

यानंतर राहुल मडावी यांच्या आदेशानुसार प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अंकुश पायगन, पोलीस उपनिरीक्षक आनंद गिरे तसेच पोलीस कर्मचारी मोरेश्वर करमे, राकेश पालकूर्तीवार, रविकुमार सुन्करी, रामकिशन बडदे आणि बिप्लव किरटोनिया यांनी दोन पंचांसमक्ष जिमलगट्टा येथे सापळा रचून संबंधित वाहनाची तपासणी केली.

तपासणीदरम्यान वाहनातून ‘मजा 108 हुक्का शिशा तंबाखू’चे 160 डबे (किंमत 1 लाख 92 हजार रुपये) आणि ‘होला हुक्का शिशा तंबाखू’ची 40 पॅकेट्स (किंमत 80 हजार रुपये) असा एकूण 2 लाख 72 हजार रुपयांचा प्रतिबंधित तंबाखूचा साठा आढळून आला. तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली सुमारे 8 लाख रुपये किमतीची इनोव्हा कार जप्त करण्यात आली. अशा प्रकारे एकूण 10 लाख 72 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

या प्रकरणात प्रशांत अंजय्या याडावर (वय 45), रा. वॉर्ड क्र. 12, गडचिरोली याला ताब्यात घेण्यात आले असून तो प्रतिबंधित हुक्का शिशा तंबाखूची अवैधरित्या वाहतूक करत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मडावी यांच्या उपस्थितीत पार पडली असून, प्रतिबंधित तंबाखूच्या अवैध व्यापाराविरोधातील ही जिमलगट्टा पोलिसांची महत्त्वपूर्ण कारवाई मानली जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास जिमलगट्टा पोलीस करीत आहेत.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.