▪️सौर कृषिपंप तक्रारींचे आता होणार निवारण.. !
▪️457 लाभार्थी, पंपधारकांना दिलासा..

राज जांभुळकर : मुख्य कार्यकारी संपादक
चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : दि. 16 एप्रिल 2026: महावितरणच्या चंद्रपूर मंडळांतर्गत ‘कुसुम बी’ आणि ‘मागेल त्याला सौर कृषि पंप’ योजनेतून आतापर्यंत 457 सौर कृषिपंप आस्थापित करण्यात आले आहेत. या सौर पंपांबाबत असलेल्या तांत्रिक व इतर तक्रारींचे निराकरण करण्यासाठी महावितरणमार्फत 17 ते 20 एप्रिलपर्यंत चंद्रपूर जिल्हाभरात तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर, वरोरा, बल्लारशाह विभागीय कार्यालयांतर्गत उपविभागीय कार्यालयात विशेष एक दिवसीय शिबिरांचे आयोजन केले आहे. या मोहिमेमुळे जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना त्यांच्या समस्या एकाच ठिकाणी सोडविण्याची संधी मिळणार आहे. सौर कृषि पंप कार्यरत नसणे, पूर किंवा वन्य प्राण्यांमुळे सोलर पॅनलचे झालेले नुकसान, पंप चोरीला जाणे, पाणी उपसा यंत्रणेतील बिघाड अथवा संपुर्ण रक्कम भरुनही पंप न मिळणे अशा विविध तक्रारींचे निराकरण केले जाणार आहे. या प्रक्रियेत पारदर्शकता आणि वेग आणण्यासाठी संबंधित अधिकृत एजन्सीचे प्रतिनिधी देखील उपस्थित राहणार आहेत.
शेतकऱ्यांनी सोबत आणायची कागदपत्रे : तक्रारींवर त्वरीत कार्यवाही व्हावी, यासाठी ग्राहकांनी शिबिरास येतांना आपला लाभार्थी क्रमांक आणि ओळखपत्र व आधारकार्ड सोबत आणणे आवश्यक आहे. या कागदपत्रांच्या आधारे संबंधित प्रकरणाचा तांत्रिक तपशील तात्काळ तपासला जाणार आहे.



