आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️राजमाता राणी हिराई सोहळ्याला गालबोट लावले, आदिवासी समाजाच्या वतीने तीव्र निषेध – प्रदेश सरचिटणीस अल्का आत्राम

▪️खासदार बाईने महिलांसाठी नेमकं काय केलं? अल्का आत्राम यांचा थेट सवाल..

 

मुख्य संपादक श्री. तुळशीराम जांभुळकर

चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : येथे राजमाता राणी हिराई यांच्या सन्मानार्थ आयोजित ऐतिहासिक सोहळ्याला जाणीवपूर्वक गालबोट लावत निराधार आरोप काँग्रेसने केला असून अशा बिनबुडाच्या आरोप खपवून घेतले जाणार नाही अशा शब्दात भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस अल्का आत्राम यांनी खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.“सन्मान हा मागून मिळत नसतो, तो कर्तृत्वाने कमवावा लागतो,” अशा थेट शब्दांत अल्का आत्राम यांनी खासदारांना खडेबोल सुनावत आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्याबद्दल तीव्र निषेध नोंदवला आहे.

अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भाजपचे नेते आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून आणि विविध संघटनांच्या आग्रहास्तव चंद्रपुरात राजमाता राणी हिराई यांचा भव्य गौरव सोहळा पार पडला. मात्र या कार्यक्रमात खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केलेल्या भाषणामुळे नवा राजकीय वाद उफाळून आला आहे. अल्का आत्राम यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, कोणाचाही अपमान करण्याचा हेतू नव्हता, परंतु खासदारांचा केवळ ‘इगो हर्ट’ झाला आहे.

“तुम्ही खासदार झाल्यापासून महिलांसाठी नेमकं काय केलं? जिल्ह्यात महिलांवर अत्याचार झाले तेव्हा तुम्ही साधी भेट द्यायलाही फिरकला नाहीत. संसदेत महिला विधेयकाला विरोध करताना महिलांची आठवण झाली नाही, मग आताच पुळका कसा?” असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित करत खासदारांवर जोरदार टीका केली आहे.

प्रतिभा धानोरकर यांनी प्रशासकीय प्रोटोकॉलवरून पार्श्वभूमीवर राणी हिराई सोहळ्यातही जाणीवपूर्वक राजकीय वातावरण निर्माण केल्याचा आरोप भाजपाचे प्रदेश सरचिटणीस अल्का आत्राम यांनी केला.आत्राम पुढे म्हणाल्या की, आदिवासी समाजाने मोठ्या मनाने खासदारांना आमंत्रित करून सन्मान दिला, मात्र त्यांनी कार्यक्रमाचे राजकारण करत त्याला गालबोट लावले. “जर केवळ सुधीरभाऊंना टार्गेट करण्यासाठी अशा क्लृप्त्या लढवत असाल, तर खबरदार! भाजप आणि आदिवासी समाज हे कधीही खपवून घेणार नाही,” असा इशाराही त्यांनी दिला.

राजमाता राणी हिराई यांनी आदिवासी समाजासाठी दिलेले बलिदान अनमोल आहे. त्यांच्या सन्मानासाठी हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. अनेक वर्षे दुर्लक्षित राहिलेल्या या मागणीला आ. सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिसाद देत शासन स्तरावर हा कार्यक्रम साकारला. “सुधीरभाऊ व्यस्त असूनही आमच्या आदिवासी समाजाच्या आग्रहास्तव कार्यक्रमाला उपस्थित राहिले. त्यांच्या अपमानाचा कोणताही हेतू नव्हता, मात्र खासदारांनी मुद्दाम याचा राजकीय मुद्दा केला,” असेही आत्राम यांनी स्पष्ट केले.

राजमाता राणी हिराई महोत्सव शासकीय स्तरावर व्हावा यासाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केवळ पुढाकार घेतला नाही, तर ₹२५ लाखांचा निधी मिळवण्यासाठी राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करत हा ऐतिहासिक सोहळा घडवून आणला. आदिवासी समाजाच्या अस्मितेशी आणि भावनांशी निगडित असलेल्या या पवित्र कार्यक्रमाला गालबोट लावण्याचे काम खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केले, हे अत्यंत संतापजनक आहे. हा अपमान केवळ एका व्यक्तीचा नसून संपूर्ण आदिवासी समाजाचा आहे. हा प्रकार आम्ही कधीच विसरणार नाही आणि यासाठी मी आदिवासी समाजाच्या वतीने खासदार प्रतिभा धानोरकर यांचा तीव्र व जाहीर निषेध करतो.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.