▪️रायपेटा गावात पाणी, रस्ते व नाली समस्यांनी नागरिक त्रस्त..

*🔸उज्वल देवनाथ*
*🔸 गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ*
*🔸 मो नं. 7499963831*
सिरोंचा – ( इंडिया 24 न्युज ) : तालुक्यातील ग्रामपंचायत घरकापेटा अंतर्गत येणाऱ्या रायपेटा गावात सध्या मूलभूत सुविधांचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. गावात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई असून नागरिकांना दररोज पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. गावातील अनेक हातपंप बंद अवस्थेत आहेत, तर नळयोजनेतून नियमित पाणीपुरवठा होत नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर परिस्थिती अधिकच बिकट होत चालली असून महिलांवर व वृद्धांवर याचा मोठा परिणाम होत आहे. तसेच रायपेटा गावातील अंतर्गत रस्त्यांचीही दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडले असून पावसाळ्यात चिखलामुळे नागरिकांना ये-जा करणे कठीण होते. शाळकरी मुले व रुग्णांना याचा विशेष त्रास सहन करावा लागत आहे.
गावातील नाल्यांची नियमित साफसफाई होत नसल्याने सांडपाणी रस्त्यावर साचत आहे. यामुळे दुर्गंधी पसरून डासांचे प्रमाण वाढले आहे व आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामस्थांनी संबंधित ग्रामपंचायत व प्रशासनाकडे तात्काळ लक्ष देऊन पाणीपुरवठा सुरळीत करणे, रस्त्यांची दुरुस्ती करणे व नाल्यांची साफसफाई करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन लवकरात लवकर उपाययोजना करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


