◼️सिंदेवाही तालुक्यात तेंदूपत्ता हंगामात मजुरांना जीविताचा धोका वाढला◼️

धनराज सरपाते- सिंदेवाही तालुका प्रतिनिधी
सिंदेवाही: (इंडिया २४ न्यूज)
सिंदेवाही तालुक्यातील बहुतांश क्षेत्र जंगलाने व्यापलेले असून मोहफुले संकलनाचा हंगाम नुकताच संपला आहे. आता तेंदूपत्ता संकलनाचा हंगाम सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर मजूर वर्ग पुन्हा जंगलाकडे वळला आहे. मात्र या काळात हिंस्त्र प्राण्याकडून होणाऱ्या हल्ल्याचा धोका वाढल्याची चिंता व्यक्त होत आहे.
स्थानिक माहितीनुसार, जंगलातील वाघ, बिबटे, अस्वल आणि रानगवे यांचे वास्तव्य नेमके कुठे आहे याची माहिती प्रामुख्याने स्थानिक नागरिकांनाच असते. त्यामुळे स्थानिक मजूर साधारणपणे अशा धोकादायक भागांना टाळतात. परंतु बाहेरील गावांतील मजूर अधिक तेंदूपाने मिळवण्याच्या उद्देशाने अनोळखी क्षेत्रात प्रवेश करतात आणि त्यामुळे अपघात व हल्ल्यांच्या घटना घडण्याची शक्यता वाढते.
तेंदुपत्ता गोळा करताना मजूर लहान लहान गटांमध्ये विखुरले जात असल्याने अनेकदा एकट्या व्यक्तीवर प्राण्याचा हल्ला होण्याच्या धोका अधिक असतो. विशेषतः उन्हाळ्यात पाण्याच्या कमतरतेमुळे वन्यप्राणी मानवी वस्तीच्या जवळ येत असल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनत आहे.
या पार्श्वभूमीवर वन विभागाने खबरदारीचे उपाय तातडीने राबवण्याची गरज व्यक्त केली जात आहे. संबंधित वन कर्मचाऱ्यांनी गावागावात दवंडी देऊन मजुरांना आपल्या गावच्या हद्दीतच तेंदूपत्ता संकलन करण्याच्या सूचना द्याव्यात, तसेच अनोळखी किंवा धोकादायक भागात जाण्यास सक्त मनाई करावी, अशी मागणी होत आहे.
तसेच संवेदनशील भागांमध्ये गस्त वाढवणे, इशारा फलक लावणे आणि मजुरांना सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन करणे आवश्यक असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे. योग्य नियोजन आणि जागरूकतेद्वारे संभाव्य अपघात टाळता येऊ शकतात, असेही जाणकाराचे म्हणणे आहे.



