◼️रत्नापूरमध्ये टी-८४ वाघीणीचा रहस्यमय मृत्यू; हल्ल्यात वनरक्षक गंभीर जखमी
ग्रामस्थांची गर्दी ठरली धोकादायक; शवविच्छेदनानंतर विसेरा तपासणीसाठी पाठविले

धनराज सरपाते- सिंदेवाही तालुका प्रतिनिधी
सिंदेवाही:(इंडिया २४ न्यूज)
चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी वनविभागांतर्गत सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील नवरगाव उपक्षेत्रातील रत्नापूर शेतशिवार परिसरात रविवार (दि.२६ एप्रिल २०२६) दुपारी घडलेल्या घटनेने परिसरात खळबळ उडाली. टी- ८४ या वाघिणीचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याने वनविभागासह नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.
दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास मक्याच्या शेतात वाघीण फिरत असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. ही माहिती वाऱ्यासारखी पसरताच वाघिणीला पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली. गर्दी वाढत असल्याने परिस्थिती तणावपूर्ण झाली आणि वाघिणीने अचानक जमावावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी लोकांना सुरक्षित करण्यासाठी धावून गेलेले वनरक्षक श्री. बारेकर यांच्यावर वाघिणीने हल्ला केला, ज्यामध्ये ते गंभीर जखमी झाले.
हल्ल्यानंतर वाघीण शेतात जाऊन बसली होती. मात्र, अवघ्या अर्धा तासात म्हणजे सुमारे दुपारी एक वाजताच्या सुमारास तिचा अचानक मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले. या अचानक मृत्यूमुळे अनेक तर्क-वितर्कांना सुरुवात झाली आहे.
घटनेची माहिती मिळताच उपवनसंरक्षक (ब्रह्मपुरी), सहाय्यक वनसंरक्षक (तेंदू व प्रादेशिक/ वन्यजीव) तसेच राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्रधिकरण, नागपूरचे प्रतिनिधी श्री. बंडू धोतरे, माजी मानद वन्यजीव रक्षक आणि अन्य अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून प्राथमिक तपास सुरू केला.
मृत वाघिणीचे वय अंदाजे नऊ ते दहा वर्षे असल्याचे सांगण्यात आले. पुढील तपासासाठी मृतदेह सिंदेवाही येथील मध्यवर्ती कास्ट भांडार येथे हलविण्यात आला. तेथे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे, डॉ. कुंदन पोडचलवार आणि डॉ. सोनकुसरे यांनी शवविच्छेदन केले. विसेरा नमुने तपासण्यासाठी पाठविण्यात आले असून अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभागाने नागरिकांना जंगल परिसरात अनावश्यक गर्दी टाळण्याचे आवाहन केले आहे.



