▪️राजोली जंगलात वाघिणीचा संशयास्पद मृत्यू कुजलेल्या अवस्थेत शव सापडल्याने कारण अद्याप अस्पष्ट..

डॉ. आनंदराव कुळे
मूल तालुका प्रतिनिधी
मो. क्र. ९४०३१७९७२७
मूल – ( इंडिया २४न्यूज ) : चंद्रपूर वन विभागाच्या सावली वन क्षेत्रातील राजोली राखीव जंगलात एका वाघिणीचा मृतदेह आढळून आल्याने वन विभागात खळबळ उडाली आहे. सदर वाघिणीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली आहे.
वन विभागाचे कर्मचारी सकाळी सुमारे ८ वाजताच्या सुमारास गस्त घालत असताना कक्ष क्रमांक ३१४ मध्ये वाघिणीचे कुजलेल्या अवस्थेतील शव आढळून आले. या घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी, पशुवैद्यकीय अधिकारी तसेच राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण चे प्रतिनिधी घटनास्थळी दाखल झाले.
मृतदेह अत्यंत कुजलेल्या अवस्थेत असल्यामुळे शवविच्छेदन करणे शक्य झाले नाही. प्राथमिक अंदाजानुसार वाघिणीचा मृत्यू सुमारे ३० दिवसांपूर्वी झाला असावा. मृत वाघिण वयस्क असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
वन परिक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत वाघिणीचे सर्व अवयव अखंड अवस्थेत आढळून आले असून कोणत्याही प्रकारची छेडछाड किंवा अवयवांची चोरी झाल्याचे आढळले नाही. मात्र मृत्यूचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.
या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय वन अधिकारी विलास तरसे यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिक्षेत्र अधिकारी विनोद धुवे (सावली) करीत आहेत. या घटनेमुळे वन्यजीव संवर्धनाच्या दृष्टीने चिंता व्यक्त केली जात आहे.



