आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️मूल तालुक्यातील फिस्कुटी येथील युवकाचा धाडसी निर्णय, विधवा महिलेशी विवाह करून दिला माणुसकीचा नवा संदेश..

 

डॉ. आनंदराव कुळे
मूल तालुका प्रतिनिधी
मो. क्र. ९४०३१७९७२७

मूल – ( इंडिया २४ न्यूज ) : समाजातील रूढी, परंपरा आणि टीकेच्या वादळाला न जुमानता, मूल तालुक्यातील फिस्कुटी येथील २९ वर्षीय पदवीधर युवक अजय रुपदेव मोहुर्ले यांनी एक धाडसी आणि प्रेरणादायी निर्णय घेतला आहे. त्यांनी एका विधवा महिलेशी विवाह करून तिच्या लहान मुलीसह तिला स्वीकारले, आणि समाजासमोर माणुसकीचा नवा आदर्श उभा केला.
आजच्या काळात, जिथे विवाह हा अनेकदा स्वार्थ, पैसा किंवा प्रतिष्ठेच्या चौकटीत मोजला जातो, तिथे अजय मोहुर्ले यांनी मानवी मूल्यांना प्राधान्य देत घेतलेला हा निर्णय विशेष मोलाचा ठरतो. त्यांच्या या कृतीमुळे एका महिलेच्या आयुष्यात नवी आशा निर्माण झाली, तर एका निरागस मुलीला वडिलांचे छत्र मिळाले.

मात्र, या सकारात्मक निर्णयालाही समाजातील काही घटकांकडून विरोध आणि टीकेचा सामना करावा लागत आहे. विधवा महिलांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन आजही संकुचित असल्याचे या घटनेतून दिसून येते. त्यांच्या वागणुकीवर, हालचालींवर आणि चारित्र्यावर सहज प्रश्न उपस्थित केले जातात, ही वस्तुस्थिती अजूनही बदललेली नाही.
अजय यांनी आपल्या भावना व्यक्त करताना समाजातील या दुटप्पी वृत्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. “दुसऱ्याच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्यासाठी आपण काही त्याग केला, तर त्यात चुकीचं काय आहे?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
ते पुढे म्हणाले की, “पैसा आज आहे, उद्या नसेल; पण माणुसकी कायम टिकते. आपण दुसऱ्याला सुख देऊ शकत असू, तर ते करणं चुकीचं कसं?”
या घटनेतून एक स्पष्ट संदेश समोर येतो — समाजाने आता आपला दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. विधवा महिलांना सहानुभूतीची नाही, तर समानतेची व सन्मानाची गरज आहे.
अजय रुपदेव मोहुर्ले यांचा हा निर्णय केवळ वैयक्तिक नसून सामाजिक परिवर्तनाची नांदी ठरू शकतो. त्यांच्या धाडसातून अनेकांना प्रेरणा मिळेल, आणि कदाचित समाजात सकारात्मक बदलाची सुरुवात होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.