▪️चामोर्शी बंद, महामार्ग रोखला 7 वर्षीय पीडितेला न्यायासाठी महिलांचा जनआक्रोश..
▪️फाशी द्या!"च्या घोषणांनी चामोर्शी हादरले..

गडचिरोली जिल्हा प्रतिनिधि उज्वल देवनाथ
चामोर्शी – ( इंडिया 24 न्युज ) : येथे 7 वर्षीय चिमुकलीवर झालेल्या अमानुष लैंगिक अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण तालुका संतप्त झाला असून आज (दि. 11 जून) हजारो महिला, युवती आणि नागरिकांनी चामोर्शी पोलीस स्टेशनवर धडक देत आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची एकमुखी मागणी केली.
“आरोपीला फाशी द्या”, “चिमुकलीला न्याय मिळालाच पाहिजे” अशा घोषणांनी पोलीस स्टेशन परिसर दणाणून गेला. संतप्त महिलांनी पोलीस स्टेशनला घेराव घालत पोलीस अधीक्षकांना घटनास्थळी बोलविण्याची मागणी लावून धरली. काही वेळातच आंदोलन तीव्र होत पोलीस स्टेशनच्या आवारातच महिलांनी ठिय्या आंदोलन सुरू केले.
या आंदोलनाची गंभीर दखल घेत पोलीस निरीक्षक दीपक डोंब यांनी वरिष्ठांना परिस्थितीची माहिती दिली. त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक एम. रमेश घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आंदोलकांशी संवाद साधत आरोपीविरुद्ध कठोर कारवाईचे आश्वासन दिले.
“या घृणास्पद कृत्याला कोणतीही माफी नाही. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी मजबूत आरोपपत्र सादर केले जाईल. शक्यतो त्याला जामीन मिळणार नाही यासाठीही कायदेशीर प्रयत्न केले जातील. तपास जलदगतीने पूर्ण करून प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालविण्यासाठी प्रयत्न करू,” असे आश्वासन पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी दिले.
दरम्यान, संतप्त नागरिकांनी चामोर्शीच्या मुख्य महामार्गावर उतरून रस्ता रोको आंदोलन छेडले. अनेक तास वाहतूक ठप्प झाली. बाजारपेठ, दुकाने आणि व्यावसायिक आस्थापना बंद ठेवून नागरिकांनी निषेध नोंदविला. परिणामी संपूर्ण शहरात वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली.
परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस निरीक्षक दीपक डोंब, वरिष्ठ अधिकारी हिरडे तसेच दंगा नियंत्रण पथकाने घटनास्थळी तातडीने मोर्चा सांभाळला. आंदोलकांची समजूत काढत वाहतूक हळूहळू सुरळीत करण्यात आली.
एका निष्पाप चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ संपूर्ण चामोर्शी रस्त्यावर उतरल्याचे चित्र पाहायला मिळाले. न्यायासाठीचा हा जनआक्रोश प्रशासनासाठीही मोठा इशारा मानला जात असून आता सर्वांचे लक्ष आरोपीला किती लवकर आणि किती कठोर शिक्षा होते याकडे लागले आहे.



