▪️व्हायरल व्हिडिओ व वृत्तपत्रातील चुकीच्या बातमीविरोधात माडेआमगाव ग्रामस्थांची पत्रकार परिषद..
▪️सदर प्रकरणाची चौकशी करून दोषीवर कारवाई करा ग्रामस्थांची पत्रकार परिषदेतून मागणी..

गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ: उज्वल देवनाथ
माडेआमगाव येथील ग्रामसेवक सुरेश मंगु पुंगाटी यांच्याबाबत सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आलेला व्हिडिओ व काही दैनिकांमध्ये प्रसिद्ध झालेली बातमी पूर्णपणे चुकीची व दिशाभूल करणारी असल्याचा आरोप ग्रामपंचायत पदाधिकारी,पेसा समितीचे सदस्य तसेच गावातील नागरिकांनी केला आहे.यासंदर्भात घोट येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.पत्रकार परिषदेत देण्यात आलेल्या माहितीनुसार,दिनांक ५ जून २०२६ रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती.ग्रामसेवक सुरेश पुंगाटी हे नेहमीप्रमाणे ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित झाले होते.कार्यालयीन कामकाजाचा आढावा घेत असताना त्यांना अचानक चक्कर आल्याने ते टेबला जवळ कोसळले.त्यावेळी सरपंच,प्रशासकीय समिती सदस्य,ग्रामपंचायत कर्मचारी व गावातील नागरिक उपस्थित होते.घटनेनंतर उपस्थितांनी तत्काळ प्रथमोपचाराची व्यवस्था केली.आरोग्य उपकेंद्रातील कर्मचाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर त्यांची रक्तातील साखरेची पातळी (शुगर) ३५० पेक्षा जास्त असून रक्तदाबही वाढलेला असल्याचे निदर्शनास आले. आवश्यक उपचारानंतर काही वेळातच ते शुद्धीवर आले.मात्र,या घटनेचे संपूर्ण सत्य समोर येण्यापूर्वीच काही व्यक्तींनी त्यांचे व्हिडिओ व छायाचित्रे काढून ते दारूच्या नशेत असल्याचा चुकीचा दावा करत सोशल मीडियावर व्हायरल केले. यामुळे ग्रामसेवकांची तसेच गावाची बदनामी करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप पत्रकार परिषदेत करण्यात आला.यानंतर विस्तार अधिकारी निंदेकर व पेसा समन्वयक निकुरे यांनी ग्रामपंचायत कार्यालयाला भेट दिली.तसेच ग्रामसेवकांसह अपूर्ण पीएम जनमन घरकुलांची पाहणी करून लाभार्थ्यांना कामे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.याबाबतचे छायाचित्र पुरावेही उपलब्ध असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.सदर व्हायरल व्हिडिओची सखोल चौकशी करून चुकीची माहिती प्रसारित करणाऱ्या व बदनामी करणाऱ्या संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी,अशी मागणी माडेआमगाव ग्रामपंचायत पदाधिकारी व नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे.पत्रकार परिषदेला सरपंच (प्रशासक) अमोल भिवा पुंगाटी, ग्रामपंचायत सदस्य दिलीप कोको नरोटे,रावजी भूचा मोहंदा, गिरजाबाई पुरुषोत्तम नरोटे,तंटामुक्ती समिती अध्यक्ष अशोक श्रीरंग मेश्राम,ग्रामकोष अध्यक्ष रावजी ठूसी मोहंदा तसेच प्रतिष्ठित नागरिक शामराव सोनू पुंगाटी, महेश बहुजी कुळमेटी, रामदास मडावी, पुरुषोत्तम धर्मा नरोटे यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.



