आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️वाघाच्या दहशतीत दोन कुटुंबांवर दुःखाचा डोंगर; साखरे व भुरसे कुटुंबीयांच्या पाठीशी माजी खासदार डॉ. अशोकजी नेते

▪️सामदा बुज येथे मृतांच्या कुटुंबीयांची घेतली भेट; वैयक्तिक आर्थिक मदत, शासकीय मदतीसाठी पाठपुराव्याची ग्वाही..

गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ : उज्वल देवनाथ

सावली, दि. २३ सप्टेंबर २०२६ : सावली तालुक्यात वन्यप्राण्यांचा वाढता वावर आणि वाघाच्या हल्ल्यांमुळे शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सामदा बुज. येथील शेतशिवारात वाघाच्या हल्ल्यात प्राण गमावलेल्या स्व. हिरामन मार्कडी साखरे आणि स्व. हेमंत अशोकजी भुरसे यांच्या कुटुंबीयांवर कोसळलेल्या दुःखाच्या प्रसंगी गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांनी त्यांच्या घरी जाऊन कुटुंबीयांची भेट घेतली.

यावेळी त्यांनी शोकाकुल कुटुंबीयांचे सांत्वन करून त्यांच्या दुःखात सहभागी होत वैयक्तिक आर्थिक मदत केली. तसेच शासन व वनविभागाकडून मिळणारी उर्वरित आर्थिक मदत तातडीने मिळावी यासाठी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली.

सामदा बुज. येथील शेतशिवारात दि. १ ऑगस्ट २०२६ रोजी शेतकामासाठी गेलेल्या स्व. हिरामन मार्कडी साखरे यांच्यावर वाघाने हल्ला करून त्यांचा बळी घेतला होता. या घटनेचे दुःख ताजे असतानाच आता नुकतेच दि. २१ सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास शेतात काम करत असलेले स्व. हेमंत अशोकजी भुरसे यांच्यावर वाघाने हल्ला केला. या सलग घटनांमुळे सामदा बुज. परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शेतकरी आणि ग्रामस्थांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

या पार्श्वभूमीवर माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांनी आज बुधवारी, दि. २३ सप्टेंबर रोजी सामदा बुज. येथे प्रत्यक्ष भेट देऊन दोन्ही कुटुंबीयांची आस्थेने विचारपूस केली. यावेळी केवळ सांत्वन न करता त्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी तत्काळ दूरध्वनीवरून संपर्क साधत परिस्थितीची माहिती घेतली.

*वाघाला जेरबंद करण्यासाठी तातडीच्या उपाययोजनांची मागणी*

डॉ. नेते यांनी सावलीचे वनपरिक्षेत्राधिकारी दुर्वे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत तातडीने प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या. वाघाचा वाढता वावर लक्षात घेता त्याला जेरबंद करण्यासाठी आवश्यक ती मोहीम तातडीने राबवावी, तसेच शेतकरी व ग्रामस्थांच्या जीविताचे संरक्षण करण्यासाठी वनविभागाने दक्षता वाढवावी, अशी मागणी त्यांनी केली.

वनविभागाकडून पीडित कुटुंबीयांना प्राथमिक मदत देण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. शासनाकडून मिळणारी उर्वरित आर्थिक मदत संबंधितांच्या बँक खात्यात विनाविलंब जमा व्हावी, यासाठी आपण वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करू, असे आश्वासनही डॉ. नेते यांनी दिले.

*वन्यप्राण्यांच्या वाढत्या वावरामुळे शेतकरी चिंतेत*

सावली तालुक्यात वाघांसोबतच हत्ती व अन्य वन्यप्राण्यांचा वावर वाढल्याने शेतकरी आणि ग्रामस्थांच्या अडचणी वाढल्या आहेत. शेतीच्या कामासाठी शेतात जाणेही धोकादायक ठरत असल्याने नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. त्यामुळे वनविभागाने केवळ कागदोपत्री उपाययोजनांपुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष क्षेत्रात प्रभावी गस्त, आवश्यक प्रतिबंधात्मक उपाय आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ठोस कार्यवाही करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी यावेळी केली.

या सांत्वन भेटीदरम्यान माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांच्यासोबत भाजपा ज्येष्ठ नेते अविनाशभाऊ पाल, भाजप तालुकाध्यक्ष किशोर वाकुडकर, तालुका महामंत्री तथा संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती सावली सचिन भाऊ तंगडपल्लीवार, सेवानिवृत्त आदर्श शिक्षक जे.के. पाल सर, माजी उपसभापती (पं.स. सावली) रविंद्र बोल्लीवार, भाजयुमो तालुका अध्यक्ष नितीन कारडे, डोनाळा उपसरपंच जितेंद्र सोनटक्के, कोंडेखल उपसरपंच नरेश बाबनवाडे,साखरीचे भाजप युवा नेते आशिष भांडेकर, सामाजिक नेते नामदेव भोयर, शक्ती केंद्र प्रमुख तथा धान्य व्यापारी प्रविण देशमुख,दुर्वजी सा.रत्नामाळ, ज्येष्ठ नेते ढिवरू पा. भांडेकर आणि अमोल पिपरे यांच्यासह सामदा बुज. येथील असंख्य नागरिक, पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

दोन कुटुंबांवर आलेल्या या दुःखद प्रसंगी त्यांच्या पाठीशी उभे राहत डॉ. अशोकजी नेते यांनी दिलेला आधार आणि शासकीय मदतीसाठी केलेला पाठपुरावा यामुळे पीडित कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.