◼️ कायदा- सुव्यवस्थेची धुरा सांभाळणाऱ्या कांचन पांडे यांना पत्रकार संघाचा भावपूर्ण निरोप
▪️सिंदेवाहीतील उल्लेखनिय कार्याची दख्खल ; बदलीनिमित्त पुष्पगुच्छ व स्मृतीचिन्ह देऊन सन्मान

धनराज सरपाते- सिंदेवाही तालुका प्रतिनिधी
सिंदेवाही 🙂इंडिया २४ न्यूज दि.२९ सप्टेंबर
सिंदेवाही पोलीस स्टेशनच्या कर्तव्यदक्ष व कार्यतत्पर पोलीस निरीक्षक मा. कांचन पांडे यांचे नुकतीच ब्रम्हपुरी येथे बदली झाली. त्यांच्या बदली निमित्त महाराष्ट्र पत्रकार संघ, मुंबई शाखा सिंदेवाही तालुकाच्या वतीने भावपूर्ण निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष श्री वहाबअली सय्यद यांनी पोलीस निरीक्षक कांचन पांडे यांचा पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानपूर्वक निरोप घेतला.
सिंदेवाही येथे कार्यरत असताना पोलीस निरीक्षक कांचन पांडे यांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली अशी भावना यावेळी उपस्थितानी व्यक्त केली. त्यांच्या कार्यकाळात विविध सामाजिक व सार्वजनिक प्रश्नाकडे संवेदनशीलतेने पाहत कायद्याच्या चौकटीत प्रभावीपणे काम करण्यात आल्याचे उपस्थितानी नमूद केले.
पोलीस प्रशासन आणि प्रसार माध्यमे यांच्यातील समन्वयाच्या दृष्टीनेही त्यांचा कार्यकाळ उल्लेखनीय राहिला. पत्रकारिता क्षेत्रातील प्रतिनिधीशी संवाद साधताना त्यांनी नेहमीच सहकार्याची भूमिका ठेवली, याबद्दल महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने त्यांचे विशेष आभार मानण्यात आले.
यावेळी बोलताना महाराष्ट्र पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष वहाबअली सय्यद यांनी कांचन पांडे यांच्या कार्याचे कौतुक करताना, “सिंदेवाहीतील कार्यकाळात त्यांनी कायदा व सुव्यवस्था राखताना कर्तव्याला सर्वोच्च प्राधान्य दिले. नागरिकांशी संवाद साधत पोलीस प्रशासनाची विश्वासाहर्ता अधिक दृढ करण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न निश्चितच उल्लेखनीय आहेत,” असे गौरवोद्गार काढले.
बदली ही प्रशासकीय प्रक्रियेचा एक भाग असली, तरी अधिकारी म्हणून आपल्या कार्याचा ठसा उमटवून जाणाऱ्या व्यक्तीला, निरोप देताना उपस्थितांमध्ये भावनिक वातावरण निर्माण झाले होते. सिंदेवाहीतील सेवाकाळातील आठवणींना उजाळा देत उपस्थितांनी कांचन पांडे यांना त्यांच्या आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच ब्रह्मपुरी येथेही त्यांनी आपल्या कार्यक्षमतेची व कर्तव्यनिष्ठेची छाप कायम ठेवावी, अशा सदिच्छा व्यक्त करण्यात आल्या.
या निरोप समारंभास, ऍडव्होकेट नंदकुमार गंडाटे, मोहम्मद रफी शेख, धनराज सरपाते, तेजेंद्र नागदेवते,ई सोमेश्वर पाकेवार, कलाम शेख, पत्रकार अमोल निनावे यांच्यासह महाराष्ट्र पत्रकार संघाचे पदाधिकारी, पत्रकार व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सिंदेवाहीतील सेवाकाळात कर्तव्यनिष्ठा, शिस्त आणि जनसंपर्काची सांगड घालत उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या पोलीस निरीक्षक कांचन पांडे यांना पत्रकार संघाच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छासह भावपुर्ण निरोप देण्यात आला.



