◼️कच्चेपार जंगल सफारीचा पुन्हा शुभारंभ
▪️पर्यटनातून रोजगार, व्यवसायाला चालना ; वन्यजिव संवर्धनाचा संदेश ▪️

धनराज सरपाते – सिंदेवाही तालुका प्रतिनिधी
सिंदेवाही 🙂 इंडिया२४ न्युज दि.१ आक्टोबर
सिंदेवाही तालुक्यातील कच्चेपार येथील जंगल सफारी गेटला गुरुवार १ आक्टोंबर २०२६ रोजी पुन्हा सुरुवात करण्यात आली. मागील वर्षी सफारी गेट सुरू करण्यात आले होते. मात्र, पावसाळ्यामुळे काही काळ सफारी बंद ठेवण्यात आली होती. यावर्षी पुन्हा सफारी सुरू झाल्याने पर्यटकासंह ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
वनपरिक्षेत्र अधिकारी अंजली सायंकार (बोरावार) यांच्या पुढाकाराने सफारी गेटच्या उद्घाटन कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच राणी देवताळे यांच्या हस्ते सफारी गेटचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी दत्तूजी हटवादे पोलीस पाटील, प्रभाकर वारजुरकर अध्यक्ष वनव्यवस्थापन समिती, रवींद्र कोवे उपसरपंच, लाखे ग्रामसेवक, यश कायरकर, जिवेश सयाम स्वाबनेचर फाऊंडेशन टीम , संदीप बांगडे, अमान कुरेशी, धनराज सरपाते पत्रकार यांच्यासह वनपरिक्षेत्रातील सर्व क्षेत्रसहाय्यक, वनरक्षक, वनकर्मचारी, सफारी गाईड आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
▪️पर्यावरणातून गावाच्या विकासाला चालना▪️
कच्चेपार परिसरात सुंदर जंगल, निसर्ग सौंदर्य आणि आणि विविध वन्यजीवाची समृद्ध संपदा आहे. जंगल सफारीच्या माध्यमातून “हा निसर्ग” बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना जवळून अनुभवता येणार असून, त्यामुळे कच्चेपार गावाची ओळख पर्यटनस्थळ म्हणून वाढण्यास मदत होणार आहे.
सफारीमुळे स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. तसेच स्थानिक व्यवसाय, लघुउद्योग आणि विविध सेवा क्षेत्रांना चालना मिळून गावाच्या आर्थिक विकासाला हातभार लागेल, त्यामुळे जंगल सफारी हे केवळ पर्यटनाची सुरुवात नसून गावाच्या विकासासाठी एक महत्त्वाची संधी असल्याचे यावेळी उपस्थितांनी नमूद केले.
▪️वन्यजीव संरक्षणाची जबाबदारी महत्त्वाची▪️
पर्यटन वाढत असताना जंगल आणि वन्यजीवांच्या संरक्षणाची जबाबदारी वाढणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. जंगल हे वन्यप्राण्यांचे नैसर्गिक घर असल्याने पर्यटकांनी वनविभागाच्या नियमांचे काटेकोर पालन करावे, वन्यजीवांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, तसेच जंगल आणि निसर्गाला कोणती हानी पोहोचणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले.
गावाचा विकास आणि वन्य जीवाचे संरक्षण या दोन्ही बाबींचा समतोल राखण्यासाठी ग्रामस्थ, पर्यटक, प्रशासन आणि वनविभाग यांनी परस्पर सहकार्य करावे, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
कार्यक्रमाच्या निमित्ताने ऋषिकेश जावडे वनरक्षक यांनी उपस्थितासाठी भोजनाची व्यवस्था केली. उत्साह पूर्ण वातावरणात जंगल सफारी गेटच्या उद्घाटन कार्यक्रमाची सांगता झाली.



