आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️मराठवाड्याची शान! माकणीच्या नंदिनीची BHMS मध्ये घवघवीत भरारी..

▪️७८ टक्के गुणांसह वैद्यकीय परीक्षा उत्तीर्ण; ‘मेडिसिन’ विषयात महाविद्यालयात प्रथम क्रमांक..

*🔸सौ. शिल्पा बंनपुरकर*
*🔸संपादक*
*🔸मो नं.7030292628*

अहमदपूर, लातूर – ( इंडिया 24 न्युज ) : : मराठवाड्याच्या लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील माकणी गावची कन्या कुमारी नंदिनी राजन माकणीकर हिने BHMS (Bachelor of Homoeopathic Medicine and Surgery) या वैद्यकीय क्षेत्रातील परीक्षेत ७८ टक्के गुण मिळवत घवघवीत यश संपादन केले आहे. विशेष अभिमानाची बाब म्हणजे ‘मेडिसिन’ या विषयात तिने आपल्या महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तिच्या या यशामुळे माकणीसह संपूर्ण लातूर जिल्हा आणि मराठवाड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

नंदिनी ही रिपब्लिकन पॅन्थर चळवळीतील ज्येष्ठ नेते तथा दिवंगत ईश्वर कांबळे यांची नात आणि महाराष्ट्रातील नामवंत विद्रोही पत्रकार, सामाजिक विश्लेषक व स्तंभलेखक डॉ. राजन माकणीकर यांची सुकन्या आहे.

जिद्द, चिकाटी, अथक परिश्रम आणि ध्येयाप्रती असलेल्या प्रामाणिक निष्ठेच्या बळावर नंदिनीने हे यश मिळवले आहे. तिच्या शैक्षणिक प्रवासात डॉ. मधुसूदन तलंकी यांनी वेळोवेळी केलेले मार्गदर्शनही मोलाचे ठरले.

आजोबांचे स्वप्न, नंदिनीने केले साकार

दिवंगत ईश्वर कांबळे यांची आपल्या नातीला डॉक्टरच्या रूपात पाहण्याची मनापासून इच्छा होती. आज ते प्रत्यक्ष या आनंदाच्या क्षणी तिच्यासोबत नसले, तरी त्यांच्या स्वप्नाची पूर्तता नंदिनीने करून दाखवली आहे. त्यामुळे तिचे हे यश केवळ एका विद्यार्थिनीचे यश नसून एका आजोबांच्या स्वप्नाला मिळालेली भावपूर्ण सलामी आहे.

बहुजनांच्या रुग्णसेवेचे ध्येय

बुद्ध-शिव-फुले-शाहू-आंबेडकर यांच्या समतावादी विचारांचा वारसा लाभलेल्या नंदिनीने आपल्या वैद्यकीय व्यवसायाकडे केवळ करिअर म्हणून न पाहता सामाजिक बांधिलकी म्हणून पाहण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

आपल्या भावना व्यक्त करताना डॉ. नंदिनी म्हणते,

«“कोणताही रुग्ण केवळ उपचाराअभावी दगावला नाही पाहिजे. शिक्षण आणि आरोग्य हे बहुजन समाजासाठी अत्यंत मोलाचे आहेत. त्यामुळे माझ्या वैद्यकीय ज्ञानाचा उपयोग दिन-दलित, वंचित, गरजू आणि दुर्बल घटकांच्या सेवेसाठी करण्याचा माझा प्रयत्न राहील. प्रामाणिकपणे, स्वाभिमानाने आणि संवेदनशीलतेने रुग्णसेवा करणे हेच माझे ध्येय आहे.”»

नंदिनीच्या या विचारांतून तिच्या वैद्यकीय शिक्षणामागील सामाजिक जाणीव आणि माणुसकीची भूमिका स्पष्टपणे दिसून येते.

मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव

नंदिनीच्या या उल्लेखनीय यशाबद्दल रिपब्लिकन सेनानी मा. आनंदराज आंबेडकर, आंतरराष्ट्रीय बौद्ध भिक्षू भन्ते विशुद्धानंद बोधी तसेच भन्ते शिलबोधी थेरो यांनी तिचे अभिनंदन करून भावी वैद्यकीय वाटचालीसाठी आशीर्वाद व शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

नंदिनीचे हे यश ग्रामीण भागातील आणि बहुजन समाजातील विद्यार्थ्यांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे. माकणीच्या मातीतून डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगून ते प्रत्यक्षात साकार करणाऱ्या नंदिनीने आपल्या कर्तृत्वाने लातूर जिल्ह्याची आणि मराठवाड्याची मान उंचावली आहे.

तिच्या या यशामागे कुटुंबीयांचे संस्कार, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि स्वतःची अथक मेहनत आहे. भविष्यात वैद्यकीय ज्ञानाच्या माध्यमातून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत सेवा पोहोचवण्याचा तिचा संकल्प निश्चितच कौतुकास्पद आहे.

नंदिनीच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, तिच्या पुढील वैद्यकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी मंगलमय शुभेच्छा व्यक्त होत आहेत.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.