▪️विद्यार्थी ग्राहक प्रबोधन ही काळाची गरज:-वर्षा नैताम पोलिस उपनिरीक्षक
▪️अज्ञानामुळे ग्राहकांची फसवणूक -दीपक देशपांडे अध्यक्ष जागृत ग्राहक राजा नागपूर विदर्भ प्रांत

डॉ. आनंदराव कुळे
मूल तालुका प्रतिनिधी
मो. क्र. ९४०३१७९७२७
मूल – ( इंडिया २४ न्यूज ) : आज सोशल मीडियाच्या आहारी गेल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एक ओढ एक आकर्षणाची भावना निर्माण होत असून ती खरेखोटे यांतील भेदभाव समजण्यापलीकडे गेली असून या आभासी दुनियेत पौगंडावस्थेतील मुलामुलींच्या आयुष्याशी खेळ मांडला जात आहे,या आभासी दुनियेत त्यांना केवळ गुरफटून ठेवले जात आहे त्यामुळे विद्यार्थी दशेतील मुलामुलींना चांगले काय आणि वाईट काय?हे पटवून देत त्यांच्यावर लक्ष ठेवण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन महिला सेवेच्या उपनिरीक्षक वर्षा नैताम यांनी जागृत ग्राहक राजा या सामाजिक ग्राहक संघटनेच्या वतीने चंद्रचूड येनुरकर माध्यमिक विद्यालय चिखली येथे विद्यार्थी ग्राहक जागृती व प्रबोधन कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोलताना केले.
जागृत ग्राहक राजा नागपूर विदर्भ प्रांताचे वतीने सध्या विदर्भात विद्यार्थी ग्राहक जनजागृती सुरु असून मूल तालुका शाखा मूल चे वतीने मूल तालुक्यातील वेगवेगळ्या शाळा महाविद्यालयांतून ही जनजागृती सुरू आहे.
चंद्रचूड येनुरकर माध्यमिक विद्यालय चिखली येथील मुख्याध्यापिका अर्चना येनुरकर यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून वर्षा नैताम उपनिरीक्षक पोलिस स्टेशन मूल, दीपक देशपांडे अध्यक्ष जागृत ग्राहक राजा नागपूर विदर्भ प्रांत हे उपस्थित होते तर अतिथी म्हणून, डॉ आनंदराव कुळे, तुळशीराम बांगरे रजनी झाडे,पुनम मडावी पोलिस पाटील चिखली,, श्री .दुमाजी चिंचोलकर , प्रतिष्ठित नागरिक यांची उपस्थिती होती.
आपल्या खुमासदार शैलीत वर्षा नैताम यांनी पोक्सो कायदा व त्यातील तरतुदी , गुन्ह्याची सुरुवात व प्रकार, आणि होत असणारी मुस्कटदाबी याबाबत सविस्तर माहिती देत विद्यार्थ्यांनी असे प्रकार घडत असतील तर ह्या बाबी लाज आणि भिती बाजूला ठेवून आपल्या मित्र-मैत्रीणी,आई वडील,शिक्षक यांचे जवळ सांगितल्याच पाहिजेत असे स्पष्ट केले, आणि या गुन्ह्यांत समाविष्ट व्यक्तीला कठोरातील कठोर शिक्षा होऊ शकते हेही स्पष्ट करताना याबाबत विद्यार्थी प्रबोधन होणे,पालकांचेही प्रबोधन होणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले आणि म्हणूनच जागृत ग्राहक राजा नागपूर प्रांताचा विद्यार्थी ग्राहक प्रबोधन हा उपक्रम अभिनंदनीय असल्याचे मत व्यक्त केले.
दीपक देशपांडे यांनी विद्यार्थ्यांना आपण शाळेत विद्यार्जनासाठी येत असल्यामुळे शाळेत जे शिकवले जाते , आणि आपण निसर्गाच्या सान्निध्यात जे शिकतो ते आपल्या घरी गेल्यावर आपल्या कुटुंबातील सदस्य, आईवडील, नातेवाईक, शेजारी यांचे सोबत चर्चा करीत ती बाब समजली असेल किंवा नसेलही पण संवाद साधून समजून घेण्याचा प्रयत्न केला तर आपण आपली फसवणूक व शोषण थांबवू शकतो .
हे शोषण मग आर्थिकअसो , व्यावहारिक असो वा शारिरीक असो,त्याविरुद्ध आवाज उठविल्याशिवाय आपल्याला न्याय मिळणार नाही,मात्र हा न्याय मागण्यासाठी आपल्याला आपले हक्क आणि अधिकार यांची माहिती असणे गरजेचे आहे व आम्ही अशा कार्यक्रमाचे माध्यमातून विद्यार्थी व शिक्षकांना ह्याच ग्राहक संरक्षण कायद्यातील अटी, तरतुदी आणि न्याय प्रक्रिया याबाबत माहिती देऊन ती बाब आपल्या कुटुंबापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे आणि बहुतेक ठिकाणी अज्ञानामुळे ग्राहकांची फसवणूक होत असल्याचे स्पष्ट करीत आम्ही हे कार्यक्रम शाळांतून राबवत असल्याने आमच्या या प्रयत्नांना शाळा प्रशासन व पोलिस प्रशासनातर्फे नैताम मॅडम यांनी सहकार्य केल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले.
शालेय उपक्रमात अशा प्रबोधनपर कार्यक्रमांचा समावेश असणे आणि यांतून विद्यार्थ्यांना नवनवीन विषयांवर मार्गदर्शन मिळणे ही बाब आमच्यासाठी आणि आमच्या विद्यार्थ्यांना निश्चितच लाभदायक ठरेल आणि भविष्यात आमचे विद्यार्थी समाजात वावरताना ग्राहक म्हणून आपल्या हक्कासाठी जागृकतेने व्यवहार करतील व आभासी जगात वावरताना कुठल्याही भुलथापांना व प्रलोभनांना बळी न पडता ही माहिती आपल्या कुटुंबातील सदस्यांना सांगतील व त्याचा लाभ घेण्यासाठी प्रयत्न करतील आणि आम्हीही तो प्रयत्न सुरू ठेवू असे मत अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापिका अर्चना येनुरकर यांनी व्यक्त केले.
डॉ आनंदराव कुळे यांनी या कार्यक्रमाचे आयोजनाची भुमिका आणि ग्राहक म्हणून आपल्याला प्राप्त अधिकार यांबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाची सुरुवात अतिथींचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत, ग्राहक गीत गायनाने झाली, या कार्यक्रमाला शाळेतील शिक्षक वृंद, कर्मचारी वृंद आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.



