▪️केळझर येथे विद्यार्थी शिक्षक जन जागृती कार्यक्रम संपन्न..

डॉ. आनंदराव कुळे
मूल तालुका प्रतिनिधी
मो. क्र. ९४०३१७९७२७
मूल – ( इंडिया २४ न्यूज ) : आज ग्राहकांना आपल्या अधिकारांची जाणीव व्हावी यासाठी आम्ही आमच्या संघटनेच्या माध्यमातून शाळा महाविद्यालयांतून जनजागृती करीत ग्राहक कुणाला म्हणायचे , ग्राहक या शब्दाची व्याप्ती आणि ग्राहक फसवणूक प्रकार आणि त्यापासून संरक्षणात्मक तरतुदी याबाबत सविस्तर आढावा घेऊन विद्यार्थी हा ज्ञानार्जन करण्याच्या दृष्टीने शाळेत येत असल्याने त्यांच्या माध्यमातून घराघरांत ग्राहक अधिकारांची जुजबी माहिती पोहोचवणे ही काळाची गरज असल्याने आम्ही अशा कार्यक्रमाचे आयोजन करीत असून याच निमित्ताने विद्यार्थी दशेत असताना विद्यार्थी कोणत्याही अत्याचाराला बळी पडू नये यासाठी त्यांना आपल्या संरक्षणासाठी काळजी घेता यावी म्हणून आम्ही पोलिस प्रशासनालाही या कार्यक्रमात सहभागी करून घेतले आहे, आणि आमचा हा उपक्रम दिवसेंदिवस विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ग्राहक जागृती साठी अतिशय मोलाची भूमिका वठवत आहे , ग्राहक म्हणून पावती मागण्याची गरज आणि ती मागणी म्हणजे ग्राहक जागृतीच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल ठरणार आहे, असे मत दीपक देशपांडे, अध्यक्ष जागृत ग्राहक राजा नागपूर विदर्भ प्रांत यांनी प्रमुख अतिथी म्हणून बोलताना आपल्या वक्तव्यातून व्यक्त केले.
मूल तालुक्यातील केळझर येथील आनंद विद्यालय केळझर येथे शनिवारी जागृत ग्राहक राजा या सामाजिक ग्राहक संघटनेच्या वतीने विद्यार्थी शिक्षक जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता,या कार्यक्रमात दीपक देशपांडे अध्यक्ष जागृत ग्राहक राजा नागपूर विदर्भ प्रांत हे प्रमुख अतिथी म्हणून तर मूल पोलिस स्टेशनच्या उपनिरीक्षक वर्षा नैताम, जागृत ग्राहक राजा मूल तालुका उपाध्यक्ष अशोक मैदमवार,काजू खोब्रागडे, सरपंच केळझर ग्रामपंचायत , प्रमोद मशाखेत्री, डॉ प्रविण गावतूरे, पोलिस उपनिरीक्षक तानु रायपूरे , सामाजिक कार्यकर्ते साईनाथ लोनबले ,व अन्य मान्यवर यांचे प्रमुख उपस्थितीत संजय येलेकर मुख्याध्यापक आनंद विद्यालय केळझर यांचे अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला.
वर्षा नैताम उपनिरीक्षक पोलिस स्टेशन मूल यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पोक्सोकायदा त्यातील तरतुदी , फसवणुकीचे प्रकार व बळी पडणारे बालक हे केवळ मुलीचं ठरत नसून मूलेही यांत बळी पडत असल्याचे सोदाहरण स्पष्ट करीत त्यापासून संरक्षणात्मक उपाययोजना म्हणून घडणाऱ्या घटनांची माहिती कोण काय म्हणेल या भितीपोटी लपवून न ठेवता आपल्या जवळच्या व्यक्तीला ,मित्र मैत्रिणी , किंवा शिक्षकांना अथवा पोलिसांना कळविण्याबाबत मुद्देसूद माहिती दिली आणि यांबाबत शिक्षेची तरतूद कशी आहे हेही पटवून दिले.
याप्रसंगी सरपंच काजू खोब्रागडे मॅडम, अशोक मैदमवार उपाध्यक्ष जागृत ग्राहक राजा मूल तालुका यांनीही मार्गदर्शन केले व ग्राहक संरक्षण अधिनियमानुसार प्राप्त अधिकार समजून घेत फसवणूक होणार नाही यासाठी सजगपणे व्यवहार करण्याची गरज प्रतिपादन केली.
संजय येलेकर मुख्याध्यापक यांनी आजच्या कार्यक्रमाचे आयोजन, त्यामागील उद्देश आणि ग्राहक म्हणून आपल्याला प्राप्त अधिकार , फसवणूक टाळण्यासाठी करावयाच्या उपाययोजना याबाबत प्रमुख अतिथींनी केलेले मार्गदर्शन विद्यार्थ्यांना व शिक्षक पालकांसाठी अतिशय मोलाचे असून पदोपदी होणारी ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी अत्यंत आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले व आमचे विद्यार्थी हे मोलाचे मार्गदर्शन त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना सांगतील व त्याचा लाभ घेण्यासाठी प्रयत्न करतील असे आवाहन केले.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थी व शिक्षकांनी शाळेच्या प्रवेश द्वारापासून दोन्ही बाजूला उभे राहून शाळेच्या आवारात प्रमुख पाहुणे व अतिथींनी प्रवेश करताच टाळ्यांच्या गजरात स्वागताने झाली ,अतिथी मंचावर विराजित होताच छत्रपती शिवाजी महाराज,बिर्सा मुंडा आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करीत करण्यात आली. पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला, शाळेच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर केले,त्यानंतर. सामाजिक व जागृत ग्राहक राजा चे कार्यकर्ते साईनाथ लोनबले यांनी प्रास्ताविक केले, व विद्यार्थ्यांना शाळेत ज्ञान ग्रहण करताना लक्ष अभ्यासावर केंद्रित करुन आपले ध्येय निश्चित करुन ते गाठण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणे गरजेचे आहे त्याचवेळी आपले कर्तव्य व अधिकार यांची माहिती असणे गरजेचे आहे यासाठी हा उपक्रम असल्याचे मत व्यक्त केले.



