▪️मूल नगरपरिषद निवडणूक 2025 : ▪️उमेदवारांची मतदार भेट मोहीम जोमात!

डॉ. आनंदराव कुळे
मूल तालुका प्रतिनिधी
मो. क्र. 9403179727
मूल – ( इंडिया 24 न्यूज ) : मूल नगरपरिषद निवडणूक 2025 जाहीर झाल्यानंतर फॉर्म भरणे आणि माघार प्रक्रियेला पूर्णविराम मिळताच आता निवडणुकीचा खरा रंग चढू लागला आहे. अध्यक्षपदासाठी चार पक्षांचे चार उमेदवार रिंगणात राहिले असून नगरसेवक पदाच्या 20 जागांसाठी पक्षीय तसेच अपक्ष उमेदवारांची स्पर्धा अधिकच रंगतदार झाली आहे.
जरी अधिकृत चिन्हांचे वाटप 26 नोव्हेंबर रोजी होणार असले, तरी सर्वच उमेदवारांनी प्रचाराची घोडदौड सुरू केली आहे. आपापल्या समर्थकांसह उमेदवार सकाळ-संध्याकाळ मतदारांच्या घरी, शेतावर, बांधावर, वाढदिवस, विवाहसमारंभ, गृहप्रवेश इत्यादी कार्यक्रमांत हजेरी लावताना दिसत आहेत.
चिन्ह मिळण्यापूर्वीच प्रत्यक्ष भेटीद्वारे मतदारांशी संवाद साधणे, त्यांचे प्रश्न जाणून घेणे आणि विश्वास संपादन करणे यावर उमेदवारांचा भर आहे.मूल नगरपरिषदेतील वीज, पाणी, रस्ते, आरोग्य आणि अतिक्रमित जागेचे पट्टे या मूलभूत प्रश्नांवर सर्वच पक्षीय उमेदवारांच्या आश्वासनांचा पाऊस सुरू झाला आहे.
मतदारांना भेट देत असलेल्या उमेदवारांमुळे शहरातील मोहल्ला- वस्त्यांवरही निवडणुकीचे वातावरण तापले असून26 नोव्हेंबरनंतर अधिकृत चिन्ह मिळाल्यानंतर प्रचाराला अधिकच वेग येण्याची शक्यता आहे.
निवडणूक जिंकण्यासाठी उमेदवारांनी मैदानात जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली असून मतदारांची मनधरणी करण्याची ही धडपड आगामी काही दिवसांत अजून रंगतदार होणार आहे.

