▪️ताडोबा बफरझोन मध्ये वाघाने केली दोन मजुरांची शिकार.
▪️दोन वेगवेगळ्या घटना, वनविभागाचे दुर्लक्ष .

डॉ. आनंदराव कुळे
मूल तालुका प्रतिनिधी
मो. क्र. ९४०३१७९७२७
मूल – ( इंडिया २४ न्यूज ) : चंद्रपूर जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्षात मोठी वाढ झाली असून शनिवारी २७ डिसेंबरला एकाच दिवशी मूल तालुक्यात विविधठिकाणी वाघाच्या हल्ल्यात दोघे ठार झाले, मानव वन्यजीव संघर्षात आताप्र्यत्न एकूण ४७ नागरिकांचा बळी गेला असून यामध्ये ४२ वाघाच्या हल्ल्यात, ३ बिबट व हत्ती आणि अस्वलाच्या हल्ल्यात प्रत्येकी एका नागरीकाचा बळी गेलेला आहे.
ताडोबा बफर क्षेत्रात सध्या बांबू कटाईचे काम सुरु असून स्थानिक मजूर मिळत नसल्याने बालाघाट जिल्ह्यातील मजुरांना बांबू कटाईच्या कामासाठी वनविभागाने बोलाविले आहे,यामध्ये काही मजूर महादवाडी तर काही मामला बीटात बांबू कटाईचे कामी करीत आहे.
मामला बीटातील कक्ष क्रमांक ३८१ मध्ये बांबू कटाईचे काम सुरु होते, कामात मग्न असलेल्या मजुरांवर दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला चढविला या हल्ल्यात ४१ वर्षीय बुदसिंग श्यामलाल मडावी राहणार मुंडला बालाघाट यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वनविभागाची चमू घटनास्थळी दाखल झाली, पंचनामा करीत असताना महादवाडी बीटतील कक्ष क्रमांक ३५७ मध्ये काम करीत असलेल्या मजुरांवर वाघाने हल्ला केला या हल्ल्यात ५५ वर्षीय प्रेमसिंग दुखी उदे राहणार बालाघाट याचा मृत्यू झाला. इतर मजुरांनी आरडाओरडा केल्याने वाघाने घटनास्थळावरुन पळ काढला.
एकाच दिवशी झालेल्या या हल्ल्याने वनविभागासह बाहेर राज्यातून आलेल्या बांबू कटाई कामगार हादरून गेले. वनपरिक्षेत्र अधिकारी प्रियांका वेलमे व त्यांच्या चमूने पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मूल उपजिल्हा रुग्णालयात पाठविले.



