आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️वाहतुकीचे नियम पाळले तर अपघात कमी होण्यास मदत..

▪️जिल्हाधिका-यांच्या हस्ते रस्ता सुरक्षा अभियान – 2026 चा शुभारंभ..

 

*🔸सौ. शिल्पा बंनपुरकर*
*🔸संपादक*
*🔸मो नं. 7030292628*

चंद्रपूर – ( इंडिया 24 न्यूज ) : दि. 01 : रस्ते अपघातात होणारे मृत्यु हे मानवनिर्मित आहे. अपघातांची संख्या आणि त्यात होणारे मृत्यु आपण नक्कीच कमी करू शकतो. मात्र त्यासाठी सर्वांनी वाहतुकीचे नियम पाळणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती, समाज, शासन आणि प्रशासन मिळून जिल्ह्यात अपघातांची संख्या कमी करू या, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले.

प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, वाहतूक नियंत्रण शाखा आणि जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या वतीने जनता महाविद्यालय येथे रस्ता सुरक्षा अभियान – 2026 चा शुभारंभ करतांना ते बोलत होते. यावेळी मंचावर मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, महानगरपालिका आयुक्त अकुनुरी नरेश, अतिरिक्त पोलिस अधिक्षक ईश्वर कातकाडे, प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे, एस.टी. महामंडळाच्या विभागीय नियंत्रक स्मिता सुतवणे, महाविद्यायाचे प्राचार्य डॉ. आशिष महातळे आदी उपस्थित होते.

रस्ता सुरक्षा अभियानाचे महत्व वाढले आहे, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, आज रस्त्यांची लांबी आणि रुंदी वाढली असून त्यावर वाहनांची संख्यासुध्दा मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे अपघातही वाढले. यात कुणी जखमी होतात तर कुणाला जीव गमवावा लागतो. भारतात दरवर्षी रस्ते अपघातात मृत्यु पडणा-यांची संख्या दीड लाखांच्यावर आहे. हे मृत्यु आपण नक्कीच रोखू शकतो. वाहतुकीचे नियम पाळले नाही तर अपघातांची संख्या वाढते, त्यामुळे सर्वांनी नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. रस्त्यावर अतिजलद जाणे टाळावे. आपले जीवन अमुल्य असून 1 – 2 मिनिटांमध्येसुध्दा आपला जीव जाऊ शकतो. त्यामुळे कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी आपले मित्र, परिवारातील सदस्य व इतरांना वाहतुकीच्या नियमांबाबत जनजागृती करावी, जेणेकरून आपला जीव सुरक्षित राहू शकेल, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी केले.

मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह म्हणाले, इतर कोणत्याही रोगापेक्षा अपघातात मृत्यु होणा-यांची संख्या जास्त आहे. रस्त्यावर सुरक्षित वाहन चालविणे, ही आपली जबाबदारी आहे. केवळ दंड आकारणे हे प्रशासनाचे ध्येय नाही तर जिवाची सुरक्षा महत्वाची आहे, असे त्यांनी सांगितले. महानगरपालिका आयुक्त अकुनुरी नरेश म्हणाले, रस्ता सुरक्षा ही आपली जबाबदारी आहे. लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठीच प्रशासनामार्फत असे उपक्रम राबविले जातात. लोकांचा सहभाग वाढला तरच रस्ता सुरक्षा अभियान यशस्वी होईल.

अतिरिक्त पोलिस अधिक्षक म्हणाले, 2024 पेक्षा 2025 मध्ये अपघात आणि त्यात होणा-या मृत्युची संख्या 7 टक्क्यांनी कमी झाली. वाहन चालवितांना स्वयंशिस्त पाळली तर अपघातांची संख्या कमी होईल. अपघात झाला तर टोल फ्री क्रमांक 108 किंवा 112 वर त्वरीत कॉल करावा. विभागीय नियंत्रण स्मिता सुतावणे म्हणाल्या, परिवहन महामंडळाच्यावतीने सुध्दा रस्ता सुरक्षा अभियान राबविले जाते. बसमध्ये विनातिकिट कुणीही प्रवास करू नये. एस.टी.चे तिकीट म्हणजे आपला 10 लाखांचा विमा असतो. एसटीच्या अपघातात अपंगत्व आले तर 75 हजार ते 5 लक्ष रुपयांपर्यंत मदत दिली जाते, असेही त्यांनी सांगितले. यावेळी प्राचार्य डॉ. महातळे यांनीसुद्धा मार्गदर्शन केले.

🔸रस्ता सुरक्षा ही सामाजिक चळवळ व्हावी : किरण मोरे

प्रास्ताविकात प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे म्हणाले, आजचे विद्यार्थी हे देशाचे जबाबदार नागरिक आणि वाहन चालविणारे सुध्दा आहेत. रस्ते अपघात हे मानवनिर्मित आहे. रस्त्यावर स्वयंशिस्त पाळली तर आपण चांगले आयुष्य जगू शकतो. प्रशासनाच्या वतीने संपूर्ण वर्षभर रस्ता सुरक्षाबाबत जनजागृती करण्यात येते. रस्ता सुरक्षा ही सामाजिक चळवळ करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

अपघातात प्राण वाचविणा-या जीवनदुतांचा सन्मान : अपघातात जखमी झालेल्या रुग्णांना त्वरीत रुग्णालयात नेण्यासाठी मदत करणा-या जीवनदुतांचा यावेळी सन्मान करण्यात आला. यात अफरोज नासीर पठाण, दीपक सावरकर, जयकांत थोरात, अमित कोसुरकर, राकेश आमने, योगेश देशमुख, सुरज ढोणे, बापुजी पवार, किशोर कोटरंगे यांच्यासह किशोर ठाकरे, अभिलाषा भगत या विद्यार्थ्यांचा सुद्धा सन्मान करण्यात आला.

तत्पुर्वी मान्यवरांच्या हस्ते रस्ता सुरक्षा मार्गदर्शिका पुस्तकाचे विमोचन करण्यात आले. यावेळी रस्ता सुरक्षा संदर्भात व मतदानाबाबत शपथ घेण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन सहायक मोटार वाहन निरीक्षक शिवाजी विभुते यांनी तर आभार श्रीमती बेग यांनी मानले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.