▪️भेजगाव येथे मोतीबिंदू नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरात २१६ रुग्णांची तपासणी..
▪️सक्षम फाउंडेशनचा सामाजिक पुढाकार; ग्रामीण भागातून नागरिकांचा उदंड प्रतिसाद..!

डॉ. आनंदराव कुळे
मूल तालुका प्रतिनिधी
मो. क्र. ९४०३१७९७२७
मूल – ( इंडिया २४ न्यूज ) : मूल तालुक्यातील भेजगाव येथे ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना मोफत व दर्जेदार नेत्रसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने भव्य निशुल्क मोतीबिंदू नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर राबविण्यात आले. समता फाउंडेशन, शालिनीताई मेघे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर आणि सक्षम फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर मंगळवार, दिनांक १३ जानेवारी रोजी ग्रामपंचायत आवारात पार पडले.दरम्यान, या शिबिराला परिसरातील ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांचा उत्स्फर्त प्रतिसाद लाभला. तज्ज्ञडॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली एकूण २१६ रुग्णांची सखोल नेत्र तपासणी करण्यात आली. तपासणीअंती १२७ रुग्ण मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरले असून, त्यांच्यावर लवकरच नागपूर येथील शालिनीताई मेघे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.रुग्णांची नागपूर येथे ने-आण, शस्त्रक्रिया, उपचार तसेच उपचारांनंतर राहण्याची संपूर्ण व्यवस्था पूर्णतः मोफत करण्यात येणार आहे. आर्थिक अडचणींमुळे उपचारांपासून वंचित राहणाऱ्या अनेक गरजू रुग्णांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.या वेळी मूल पंचायत समितीच्या माजी सभापती नलिनीताई तेल्लावार उद्घाटिका म्हणून उपस्थित होत्या, तर पंचायत समितीचे माजी सभापती प्रकाश गांगरेड्डीवार अध्यक्षस्थानी होते.या निमित्ताने सामाजिक कार्यकर्त्या निमाताई शेंडे, उमेदच्या उद्योग सखी ज्योती अंबोरकर, समुदाय संसाधन व्यक्ती सारिका रेड्डीवार, रोजगार सेवक विलास सोनुले, समता फाउंडेशनचे प्रतिनिधी आकाश निकुरे तसेच सक्षम फाउंडेशनचे अध्यक्ष शशिकांत गणवीर आणि सारिका बावणे यांची उपस्थिती लाभली.यावेळी उपस्थित मान्यवरांनी ग्रामीण भागात अशा आरोग्यविषयक उपक्रमांची नितांत गरज असल्याचे मत व्यक्त करत सक्षम फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक केले. मोतीबिंदूमुळे दृष्टी बाधित झालेल्या रुग्णांसाठी हे शिबिर अत्यंत लाभदायक ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले.दरम्यान या उपक्रमाचे संचालन वैभव गणवीर यांनी केले. प्रस्तावना विशाखा गणवीर यांनी मांडली, तर आभार सारिका बावणे यांनी व्यक्त केले.या कामगिरीच्या यशासाठी वैशाली म्याकलवार, दीप्ती वाढई, अमित वाढई, किसन गुरनुले, मनोज गणवीर यांच्यासह अनेक स्वयंसेवकांनी अथक परिश्रम घेतले.या शिबिरामुळे अनेक गरजू रुग्णांना नवदृष्टी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून, सक्षम फाउंडेशनचा हा प्रयत्न सामाजिक आरोग्य सेवेत मोलाची भर घालणारा ठरला आहे.


