▪️पिकप मॅटेडॉर गाडीने पाच वर्षाच्या मुलीला धडक.. मुलगी जागीच ठार
▪️भवराळा येथील खेडी- गोंडपिपरी मुख्य रस्त्यावरील घटना..

डॉ. आनंदराव कुळे
मूल तालुका प्रतिनिधी
मो. क्र. ९४०३१७९७२७
मूल – ( इंडिया २४ न्यूज ) : खेडी – गोंडपिपरी प्रमुख राज्य मार्ग क्रमांक ९ या मार्गावर नेहमीच अपघात होत असून, दिनांक १५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ८.३० वाजता याच मार्गावर असलेल्या भवराळा या गावी अपघातात पाच वर्षाची मुलगी ठार झाली. भवराळा हे गाव याच राज्य मार्गावर असून रस्त्याच्या दोन्ही बाजूला घरे आहेत. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला दुकान असल्याने सोमेश्वर सरपाते यांची एकुलती एक मुलगी रुद्रप्रिया सोमेश्वर सरपाते वय वर्ष (५) ही रोड क्रॉस करुन दुकानात जात असताना खेडी – गोंडपिपरी रस्त्याने भरधाव वेगाने येणाऱ्या पिकप मॅटेडॉर गाडी क्रमांक MH – 34 – BG – 3643 या शेळ्या वाहतूक करणाऱ्या गाडीने जोरदार धडक दिल्याने लहानशा मुलीचा जागीच मृत्य झाल्याची घटना घडली.
मॅटेडॉर गाडी मौजा जुनासुर्ला येथील शंकर किसन शेंडे यांच्या मालकीची असून गाडी चालक मुखरु ऋषी मेश्राम रा.पाथरी हल्ली मु. जुनासुर्ला हे चालवत असल्याचे समजते. घटनेची माहिती मूल पोलिसांना प्राप्त होताच मूल पोलिस निरीक्षक विजय राठोड यांनी आपली टीम घेऊन तात्काळ घटनास्थळ गाठले व ड्रायव्हरला पोलिसांनी ताब्यात घेतले. मुलीचा मृत्युदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय मूल येथे हलविण्यात आले असून सोमेश्वर सरपाते यांना एकच मुलगी असल्याने घटनास्थळी पूर्ण गाव जमा झाला. मुलीचे प्रेत उचलू नये अशी मागणी मृतक मुलीच्या आई वडिलांनी व गावकऱ्यांनी केली. मूल पोलिसांनी ग्रामस्थांना शांत करुन समजाऊन सांगितल्याने गावकरी शांत झाले.
घटनास्थळाचा मोका चौकशी पंचनामा करण्यात आला असून पुढील तपास मूल पोलिस निरीक्षक विजय राठोड करीत आहेत.
खेडी – गोंडपीपरी राज्य मार्गावर एकही स्पीड ब्रेकर नाही.त्यामुळे अपघात वाढलेले आहेत. खेडी – गोंडपीपरी हा प्रमुख राज्य मार्ग क्रमांक ०९ निर्माण करण्यात आला असून आतापर्यंत या मार्गावर कोणत्याही गावाजवळ एकही स्पीड ब्रेकर करण्यात आलेला नाही.त्यामुळे या मार्गावर जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात असून भरधाव वेगाने वाहने धावत असतात. याच मार्गावरून सुरजागड खदानीकडे जड वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यासाठी हा मार्ग ज्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे येते त्या विभागाने तात्काळ स्पीड ब्रेकर लावावे अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.


