▪️मुल–चामोर्शी–मार्कंडा रस्ता धोकादायक; भाविकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न

*🔸श्री. उज्वल देवनाथ*
*🔸 गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ*
*🔸 मो नं. 7499963831*
गडचिरोली – ( इंडिया 24 न्युज ) : महाशिवरात्री निमित्त दरवर्षी प्रमाणे यावर्षीही मार्कंडा येथील भगवान शिव शंकराच्या जत्रेसाठी विदर्भासह राज्यातील तसेच देश-विदेशातील हजारो भाविक मोठ्या श्रद्धेने उपस्थित राहतात. प्राचीन व ऐतिहासिक महत्त्व असलेल्या मार्कंडा येथील शिव मंदिरात महाशिवरात्रीला मोठ्या प्रमाणात जत्रा भरत असून या धार्मिक सोहळ्याला विशेष महत्त्व आहे.
मात्र, या महत्त्वाच्या जत्रेच्या पार्श्वभूमीवर मुल–चामोर्शी ते मार्कंडा या मुख्य मार्गाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून अनेक ठिकाणी रस्ता उखडला आहे. परिणामी वाहनचालक व भाविकांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.विशेषतः रात्रीच्या वेळी अंधारामुळे अपघाताचा धोका अधिक वाढला असून कोणतीही दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.महाशिवरात्रीच्या जत्रेसाठी हजारो भाविक व वाहनांची मोठ्या प्रमाणावर ये-जा होणार असल्याने या खराब रस्त्यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे जत्रेच्या आयोजनावर गालबोट लागण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.या गंभीर समस्येकडे प्रशासन संबंधित विभागाचे अधिकारी तसेच लोकप्रतिनिधी यांनी तातडीने लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करावी,अशी मागणी भाविक,नागरिक तसेच विविध सामाजिक संस्था व संघटनांकडून करण्यात येत आहे.भाविकांच्या सुरक्षिततेसाठी त्वरित उपाययोजना करणे आवश्यक असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.
महाशिवरात्रीसारख्या पवित्र पर्वासाठी येणाऱ्या भाविकांना सुरक्षित व सुरळीत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची जबाबदारी असून रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी जोर धरत आहे.



